भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara
भंडारदरा धरण पाणलोटात काल बुधवारपासून वरूणराजा पुन्हा एकदा कोसळू लागल्याने पाणलोटातील शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे. काल सायंकाळी संपलेल्या 12 तासांत धरणात नव्याने 11 दलघफू पाणी दाखल झाले.
11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणात यंदा केवळ 9 टक्के होता. त्यात हळुवार आवक होत असल्याने हा पाणीसाठा काल सायंकाळी 1443 दलघफू (13.07टक्के) झाला होता.
काल दिवसभर पाऊस अधूनमधून कोसळत होता. पण त्यात फारसा जोर नव्हता. यंदाच्या हंगामात केवळ 400 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले आहे.पाणलोटात अद्याही म्हणावा तसा पाऊस नसल्याने लाभक्षेत्रात काळजीचे वातावरण आहे. 102 दलघफू क्षमतेच्या वाकी तलावातील पाणीसाठा 52.29 दलघफू झाला आहे. धरण परिसरात पावसाळी वातावरण टिकून आहे.
मुळा पाणलोटात जोरदार पाऊस
पिंपळगाव खांड धरणातून पाणी सोडले
कोतूळ |वार्ताहर| Kotul
नगर जिल्ह्यातील शेती, पिण्याचे पाणी, उद्योग आणि व्यापाराच्यादृष्टीने महत्वाच्या मुळा धरण पाणलोटात बुधवारी जोरदार पाऊस झाल्याने पेरण्यांना वेग आला आहे. मुळा धरण पाणलोट क्षेत्रात आंबित, पाचनई, कुमशेत, हरिश्चंद्रगड परिसरात कालपासून पाऊस कोसळत आहे.े मुळा नदीचा प्रवाह आंबित धरणाच्या सांडव्यावरून सुरू आहे. परिणामी मुळा नदीवरील 600 दलघफू क्षमतेच्या पिंपळगाव खांड धरणाचा पाणीसाठा काल रविवारी 256 दलघफूपर्यंत पोहचला होता.
सोमवारी हा पाणीसाठा 318 दलघफू झाला होता. त्यानंतर या धरणातून पिण्याच्या पाण्याचे रोटेशन सोडण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. त्याची दखल घेऊन बुधवारी रात्री 9 वाजता जिल्हाधिकार्यांच्या आदेशाने पाणी सोडण्यात आले. मुळा पाणलोटात पावसास सुरूवात झाल्याने हरिश्चंद्रगड व अन्य ठिकाणचे सौंदर्य बहरू लागले आहे. धबधबे, ओढेनाले सक्रिय झाल्याने मनमोहक चित्र पहावयास मिळत आहे.