521 दलघफू पाण्याची विक्रमी आवक
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara
उत्तर नगर जिल्ह्याचे वरदान ठरलेल्या भंडारदरा धरणाच्या पाणलोटात शुक्रवारी रात्रीपासून आषाढ सरींचे तांडव सुरू असल्याने 24 तासांत धरणात नव्याने विक्रमी 521 दलघफू पाण्याची आवक झाली. त्यामुळे 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरातील पाणीसाठा काल सायंकाळी 2510 दलघफू (22.73 टक्के) झाला होता. काल दिवसभरही पाणलोटात पावसाचा जोर कायम असल्याने रविवारीही पाण्याची आवक अधिक होण्याची शक्यता आहे.
डोंगररांगा धुक्यांनी लेपाटून गेल्या असून पाणलोटात आषाढ सरी जोरदार बरसत असल्याने डोंगरदर्यांमधून धबधबे आक्राळ विक्राळ रूप घेऊ लागले आहेत, त्यामुळे ओढे-नाले भरभरून धरणात विसावत आहे. काल सकाळी संपलेल्या 12 तासात धरणात नव्याने 291 दलघफू पाणी दाखल झाले. त्यापैकी आवर्तनापोटी 31 दलघफू पाणी खर्ची पडले. तर 260 दलघफू पाणी धरणात विसावले. दिवसभर घाटघर, पांजरे आणि रतनवाडीत पाऊस जोरदार कोसळत असल्याने सायंकाळी संपलेल्या 12 तासांत आणखी 230 दलघफू पाणी नव्याने आले.
गत 24 तासांत धरणात नव्याने 521 दलघफू पाणी आले. या हंगामातील आतापर्यंतचा विक्रम आहे. भंडादरात काल दिवसभर पडलेल्या पावसाची नोंद 19 मिमी झाली आहे. गत 24 तासांत पडलेला पाऊस भंडारदरा 14, घाटघर 62, पांजरे 47 आणि रतनवाडी 56 मि.मी.आहे. 112 दलघफू क्षमतेचे वाकी तलावही ओव्हरफ्लो झाला असून 556 क्युसेकने पाणी सुरू आहे. यामुळे आता निळवंडे धरणातही नवीन पाण्याची आवक वाढु लागली आहे. दरम्यान, शनिवार व रविवारची सुट्टी असल्याने पर्यटकांनी भंडारदरातील निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी गर्दी करत आहेत.
मुळा दुथडी, धरणात आवक सुरू
कोतूळ |वार्ताहर| Kotul
दक्षिण नगर जिल्ह्यातील शेती, पिण्याचेे पाणी, व्यापार आणि नगर एमआयडीचे भवितव्या अवलंबून असलेल्या मुळा धरणाच्या अकोलेतील पाणलोटात कालपासून आषाढ सरींनी जोर धरल्याने अकोलेत मुळा नदी दुथडी वाहू लागली आहे.
हरिश्चंद्र गड, पाचनई, आंबित परिसरात जोरदार सरी बरसत असल्याने काल तासागणिक कोतूळ येथील मुळा नदीचा विसर्ग वाढत होता. शुक्रवारी सकाळी कोतूळ येथील मुळा नदीचा निसर्ग 3212 क्युसेकने सुरू होता. पण दुपारनंतर पावसाने काहीशी उघडीप दिल्याने तो सायंकाळी 2247 क्युसेकपर्यंत खाली आला होता. शनिवारी सकाळीही तीच अवस्था होती. पण त्यानंतर आषाढ सरींचे तांडव सुरू असल्याने सायंकाळी मुळा नदी दुथडी वाहत होती. कोतूळ येथील मुळेचा विसर्ग 13375 क्युसेक होता.
पाणलोटात पावसाचा जोर टिकून असल्याने प्रथमच मुळा धरणात नव्याने पाण्याची आवक सुरू झाली आहे. काल सकाळपर्यंत 92 दलघफू पाणी दाखल झाले होते. आज पाण्याची आवक वाढणार आहे. दरम्यान, पावसामुळे भात खाचरांमध्ये पाणी साचू लागल्याने भात आवणीच्या कामात शेतकरी गुंतला आहे.
दारणात अर्धा टिएमसी पाण्याची आवक
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील घोटी, इगतपुरी परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे दारणात 24 तासात अर्धा टिएमसीहून अधिक नवीन पाणी दाखल झाले. भावलीत 97 दलघफू तर मुकणेत 51 दलघफू पाणी दाखल झाले.
शनिवारी सकाळी 6 वाजेपर्यंत संपलेल्या 24 तासात पावसाची घाटमाथ्यावर धुव्वाधार बरसात झाली. भावलीच्या भिंतीजवळ 124 मि.मी. पावसाची नोंद झाली. तर इगतपुरीला 110 मि.मी., घोटीला 72 मि.मी., दारणाच्या भिंतीजवळ 26 मि.मी. पावसाची नोंद झाली. यामुळे धरणांमध्ये पाण्याची आवक वाढत आहे. दारणाच्या पाणलोटातील पावसामुळे 24 तासात 537 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले. हे पाणी अर्धा टिएमसीपेक्षा अधिक आहे. दारणात 1 जूनपासून काल सकाळपर्यंत जवळपास 1 टिएमसी पाण्याची
नव्याने आवक झाली आहे. या धरणात मागील 24 तासात पाण्याचा साठा 9.05 टक्क्यांवरुन 16.56 टक्के झाला आहे. 24 तासात 7.51 टक्क्यांनी धरणात पाण्याची वाढ झाली आहे. भावली धरणाचा साठा 25 टक्क्यांच्या जवळपास पोहचला आहे. भावलीच्या पाणलोटातील घाटमाथ्यावर पावसाचे जोरदार आगमन होत आहे. काल सकाळी मागील 24 तासात 124 मि.मी. पावसाची नोंद झाली. पावसाचे सातत्य टिकून राहिल्यास इतर धरणांच्या तुलनेत हा प्रकल्प लवकर ओव्हरफ्लो होतो. या प्रकल्पात 24 तासात 97 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. आतापर्यंत या प्रकल्पात 352 दलघफू नवीन पाणी दाखल झाले आहे. मुकणे धरणात 3.70 टक्के साठा तयार झाला आहे. या धरणात 24 तासात 51 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. वाकी धरणात 2.01 टक्के पाणीसाठा झाला. वाकीत 14 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. वालदेवीत 5.21 टक्के साठा आहे. तर कडवा धरणात 12.68 टक्के पाणीसाठा तयार झाला आहे.
गंगापूर धरण 23.23 टक्क्यांवर पोहचले आहे. या धरणाच्या भिंतीजवळ काल सकाळी 6 पर्यंत मागील 24 तासात 13 मि.मी. पावसाची नोंद झाली. धरणात 37 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. या हंगामात नव्याने 311 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले. गंगापूर धरण समुहातील गौतमी गोदावरी धरणात 12.47 टक्के, कश्यपीत 4.97 टक्के पाणी साठा तयार झाला आहे. आळंदी धरणाचा साठा सलग दुसर्या दिवशी 1.96 टक्क्यांवर स्थिर आहे. धरणावरील नोंदला गेलेला पाऊस असा- दारणा 26 मि.मी., मुकणे 19, वाकी 39, भाम 68, भावली 124, गंगापूर 13, कश्यपी 25, गौतमी गोदावरी 16, कडवा 15, आळंदी 3, नाशिक 5, घोटी 72 मि.मी., इगतपूरी 110, त्र्यंबक 17, अंबोली 21 मि.मी. असा पाऊस नोंदला गेला.
गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील देवगावला 2मि.मी., कोळगावला 2 मि.मी. पाऊस नोंदला गेला अन्यत्र पावसाने हजेरी लावली नाही. दरम्यान नांदूरमधमेश्वर बंधार्याच्या पाणलोटातील पावसाने या बंधार्यातून 100 क्युसेकने विसर्ग गोदावरी नदीत सुरु आहे. काल सकाळ पर्यंत 1783 क्युसेकचा विसर्ग गोदावरीत झाला. म्हणजेच 154 दलघफू पाणी गोदावरीत वाहत आहे. गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात कोपरगाव व राहाता तालुक्यात पावसाने उघडीप दिली आहे. शेतकरी मुसळधार पावसाची चातकासारखी वाट पाहत आहेत. खरीपातील उगवून आलेले रोपटे कोमेजून जाण्याच्या बेतात आहे.