भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara
शेंडी भंडारदरा प्रकल्प वसाहत येथे दि. 12 ते 16 ऑगस्ट चार दिवस भंडारदरा वर्षा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या कार्यक्रमासाठी स्थानिक नागरिक, व्यापारी व पत्रकार यांना तसेच भंडारदरा प्रकल्प वसाहत ही भंडारदरा गाव ग्रामपंचायत हद्दीत येत असून त्यांना देखील कल्पना न देता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे भंडारदरा ग्रामस्थ, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी या कार्यक्रमाला विरोध दर्शविला.
या कार्यक्रमा संदर्भात कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास नियमानुसार परवानगी घेऊन व आम्हांला पूर्व कल्पना दिली असती तर ग्रामस्थांचाही सहभाग राहिला असता. तसेच या कार्यक्रमातून स्थानिकांना रोजगार मिळाला असता, अशा संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.
दरम्यान, यासंदर्भात महाराष्ट्र पर्यटन निवासच्या आयोजक मधुमती देसाई यांनी आम्ही भंडारदरा ग्रामपंचायतची रितसर परवानगी घेऊन एक दिवस उशिराने कार्यक्रम पूर्ववत घेऊ तर स्थानिक ग्रामस्थ, व्यापारी, गावकरी तसेच पत्रकार बांधवांची दिलगिरी व्यक्त करत सर्वांना कार्यक्रमासाठी सहभागी होण्याचे आमंत्रण देखील दिले.
अशाचप्रकारे यापूर्वी देखील काजवा महोत्सवाच्या नावाने पालकमंत्री, खासदार, आमदार यांचा नामोल्लेख करुन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आंम्हा स्थानिकांना विश्वासात न घेता आमंत्रण न देता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. ही संशयास्पद बाब असून सदर आयोजकांची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. या संदर्भात आपण संबंधित वरिष्ठांना पत्रव्यवहार करुन सत्य पडताळणी करण्याची मागणी करणार आहोत.
दिलीप भांगरे, माजी पंचायत समिती सदस्य.