Friday, November 22, 2024
Homeनगरकोणत्याही क्षणी भंडारदरातून पाणी सोडणार

कोणत्याही क्षणी भंडारदरातून पाणी सोडणार

पाणलोटात जोरदार पाऊस || कुकडी प्रकल्पात 50 टक्के पाणीसाठा

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

पाणलोटात पुन्हा एकदा आषाढ सरींनी तांडव नृत्य सुरू केल्याने भंडारदरा धरणात नव्याने पाण्याची आवक वाढली आहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाकडून धरणातून पाणी सोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी आज बुधवारी कोणत्याही क्षणी प्रवरा नदीत विसर्ग सोडण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास निळवंडेतीलही पाणीसाठा वेगाने वाढणार आहे.

- Advertisement -

चार-पाच दिवसांपूर्वी पाणलोटातील पाऊस कमी झाल्याने धरणात येणारी पाण्याची आवक कमी झाली होती. पण सोमवारी रात्रीपासून पाणलोटात आषाढसरींनी फेरा वाढविला. मंगळवारी तर सकाळपासून या आषाढसरींनी तांडव करण्यास सुरूवात केली. त्यामुळे धरणात आवक वाढली. मंगळवारी सकाळी संपलेल्या 24 तासांत धरणात नव्याने 326 दलघफू पाणी जमा झाले. त्यापैकी वीज निर्मितीसाठी 70 दलघफू पाणी वापरले गेले.साठ्यात 326 दलघफू पाणी जमा झाले. त्यामुळे 11039 दलघफू क्षमतेच्या या धरणात 9638 दलघफू (87.31 टक्के) झाला होता. रे, रतनवाडीत आषाढ सरी जोरदार कोसळत असल्याने धरणात नव्याने पाण्याची आवक होत आहे.

काल दिवसभरात बारा तासांत 293 दलघफू पाण्याची आवक झाली. त्यापैकी 35 दलघफू पाणी वापरले गेले. तर 258 दलघफू पाणी जमा झाले. परिणामी सायंकाळी धरणातील पाणीसाठा 9896 दलघफू(89.65टक्के) झाला होता. वाढलेला पाऊस आणि होणारी आवक यामुळे जलसंपदा विभागाने हालचाली सुरू केल्या ओहत. अभियंता आणि त्यांचे सहकारी पाणी साठ्यावर करडी नजर ठेवून आहेत. 10400 अथवा 10500 दलघफू पाणीसाठा झाल्यानंतर पाण्याची पाणी नियंत्रणासाठी प्रवरा नदीत पाणी सोडण्यात येण्याची शक्यता आहे.

निळवंडे 51 टक्के

भंडारदरात जोरदार पाऊस कोसळत असल्याने निळवंडे धरणातही पाण्याची जोरदार आवक होत आहे. 8330 दलघफू क्षमतेच्या निळवंडेत काल मंगळवारी सकाळी 4140 दलघफू (49.76टक्के) पाणी होते. त्यानंतर आवक सुरूच असल्याने 98 दलघफू पाण्याची आवक झाली. त्यामुळे सायंकाळी या धरणातील पाणीसाठा4238 दलघफू (50.89टक्के) झाला होता.रात्री हा पाणीसाठा 51 टक्क्यांच्या पुढे गेला होता. भंडारदरात पाऊस सुरू असल्याने आज बुधवारी या धरणातील पाणीसाठा 55 टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे.

मुळात आवक वाढली

कोतूळ |वार्ताहर| Kotul

सोमवारच्या तुलनेत मंगळवारी पाणलोटात पावसाचा जोर काहिसा वाढल्याने मुळा धरणात आवक वाढु लागली आहे. काल मंगळवारी सकाळी कोतूळ येथील मुळा नदीचा विसर्ग 4024 क्युसेक होता. त्यानंतर पावसाचा जोर वाढल्याने दुपारी 3 वाजता हा विसर्ग 4227 क्युसेकपर्यंत वाढला. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता हा विसर्ग 5990 क्युसेकपर्यंत वाढला होता. तर 26000 दलघफू क्षमतेच्या मुळा धरणातील पाणीसाठा 16228 दलघफू झाला होता. हरिश्चंद्र गड, पाचनई, आंबित भागात पावसाचा जोर वाढल्याने पाण्याची आज आवक वाढण्याची शक्यता आहे.

कुकडी प्रकल्पात 50 टक्के पाणीसाठा

घोड 53 तर डिंभे 75 टक्के भरले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दक्षिण नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या कुकडी प्रकल्पात 50 टक्के पाणीसाठा झाला आहे. या समूह धरणातील एकूण पाणीसाठा 14214 दलघफू (50 टक्के) झाला आहे. घोड धरणातील पाणीसाठा 53 आणि सर्वाधिक क्षमता असलेल्या डिंभे धरणातील पाणीसाठा 75 टक्के झाला आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यातील लाभक्षेत्रात समाधानाचे वातावरण आहे.
जूनअखेर कुकडी प्रकल्पात केवळ 4 टक्के पाणी असल्याने पाणलोटासह पारनेर, कर्जत आणि श्रीगोंद्यातील लाभक्षेत्रात चिंतेचे वातावरण होते.

पण गत 10 दिवसांपासून आषाढ सरी कोसळू लागल्याने या समूह धरणातील पाणीसाठा हळू हळू वाढु लागला. 13500 दलघफू क्षमता असलेल्या डिंभेत 9141 दलघफू (73.16 टक्के) झाला होता. रात्री उशीरा या धरणातील पाणीसाठा 75 टक्के झाला. येडगाव धरणातील पाणीसाठा 74.71 टक्के, माणिकडोहमध्ये 33.47, वडजमध्ये 52.32 टक्के झाला आहे. तर पिंपळगाव जोगेत मायनस 12 टक्के पाणी आहे. गतवर्षी या प्रकलत 54 टक्के पाणी होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या