नाशिक | फारूक पठाण
कौटुंबिक हिंसाचार म्हणजे असा प्रकार जिथे घरातील व्यक्तीवर हिंसा आणि अत्याचार हा घरगुती वातावरणात होतो. हा हिंसाचार अनेक प्रकारे असू शकतो जसे की मारहाण, त्रास देणे, मानसिक छळ इत्यादी. हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, कौटुंबिक हिंसा ही केवळ शारीरिक नसून पीडितेवर सत्ता आणि नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करणारे कोणतेही वर्तन आहे आणि या हिंसाचाराचा पहिला बळी ठरतो तो महिलेचा. तिला कायद्याचे पाठबळ असूनही नमूटपणे अत्याचार सहन करत असते. याबाबतची आकडेवारीही मन सुन्न करणारी आहे. कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी अनेक कायदे तयार करण्यात आले. परंतु या प्रकरणांचा आलेख उंचावतच आहे. याबाबत ‘देशदूत’ने पोलीस, कायदेतज्ज्ञ यांच्याशी संवाद साधून घेतलेला हा आढावा.
सध्या आधुनिक युग आले आहे. प्रत्येकाच्या हातात अॅण्ड्रॉईड फोन दिसत आहेत, त्याच्यात मुबलक प्रमाणात सोशल मीडिया वापरण्यासाठी इंटरनेटचा डाटादेखील आहे. हे सगळे चांगले असले तरी त्याचे वाईट परिणाम मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. मागील काही वर्षांत यामुळे तसेच इतर कारणांमुळे कौटुंबिक हिंसेचे प्रमाण वाढले आहे. कौटुंबिक हिंसा नको तसेच कोणाचा संसार उद्ध्वस्त होऊ नये, यासाठी पोलीस दलाच्या वतीने विशेष ‘भरोसा पथक’ तयार केले असून त्याद्वारे मोठ्या प्रमाणात कौन्सिलिंग करण्यात येत आहे. विशेष म्हणजे त्याला चांगले यशदेखील मिळत असल्याचे निदर्शनास आले आहे.
राज्यात मोठ्या शहरांपासून अगदी ग्रामीण भागातल्या दुर्गम भागातही महिलांवरील कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारींत वाढ होत आहे. कुटुंबातील वाद, सासू-सासरे, दीर व नवर्याशी होणार्या वादातून तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. सध्याच्या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम कौटुंबिक व्यवस्थेवरही होत असल्याचे दिसून येत आहे. हल्ली नोकरी करणार्या महिलांची संख्या वाढत आहे. त्या काम करताना घरही सांभाळतात. तरीही महिलांकडून घरातल्या कामाच्या अपेक्षा वाढत असल्याने तक्रारींची संख्यादेखील वाढत आहे. कुटुंब व्यवस्था हा आपला कणा आहे, पण सध्याच्या परिस्थितीत या व्यवस्थेला तडा जाईल, अशी परिस्थिती निर्माण होत आहे.
केवळ मोठ्या शहरांतूनच नव्हे तर ग्रामीण-दुर्गम भागातूनही कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारी वाढल्या आहेत. करोनाकाळात बालके आणि स्त्रियांवरील हिंसाचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. नाशिक शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे.विविध ठिकाणी नवनवीन वस्त्या निर्माण झाल्या आहेत. त्याअनुषंगाने गुन्हेगारीतदेखील वाढ झाली आहे. तर दुसरीकडे कौटुंबिक हिंसेचे प्रमाणदेखील वाढताना दिसत आहे.
1 जानेवारी 2023 पासून 30 जुलै 2023 याकाळात नाशिक पोलीस आयुक्तालयाअंतर्गत महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या भरोसा विशेष शाखेत एकूण सुमारे 474 कौटुंबिक हिंसेचे तक्रार अर्ज प्राप्त झाले आहेत. दरम्यान, तक्रार अर्ज प्राप्त झाल्यावर भरोसा पथकाच्या वतीने त्या कुटुंबातील सदस्यांचे कौन्सिलिंग करण्यात येते. त्याचा चांगला परिणाम दिसून येत आहे.
एकूण मिळालेल्या तक्रार अर्जांपैकी आतापर्यंत 170 तक्रार अर्जांचा निपटारा भरोसा पथकाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. त्यांचे सुखी जीवन ते जगत आहेत. 304 तक्रार अर्ज शिल्लक असून त्याच्यावर भरोसा पथकाच्या माध्यमातून कौन्सिलिंगचे काम सुरू आहे. तर चालू वर्षात एकूण 18 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही आहेत कारणे
पोलिसांकडे येणार्या कौटुंबिक हिंसेच्या तक्रारींमध्ये अधिकतर तक्रारी महिलांच्या वतीने असतात. त्यात प्रामुख्याने नवरा दारू पिऊन येतो व मारहाण करतो, तसेच कारण नसताना मारहाण करतो, जुगार खेळतो, त्याचप्रमाणे लग्नानंतर सुनेकडून घर तसेच गाडी घेण्यासाठी पैशांची मागणी करणे, त्यासाठी त्रास देणे, लग्न जुळत असताना मुलगा कामावर आहे असे सांगितले जाते व नंतर लग्नानंतर तो रिकामा असल्याचे समोर आल्यावर तक्रार दाखल केली जाते. त्याचप्रमाणे अनैतिक संबंध हे कारणदेखील कारणीभूत ठरते. विशेष म्हणजे सध्याच्या काळात मोबाईल फोन हे एक मोठे कारणदेखील कौटुंबिक हिंसेला जबाबदार असल्याचे समोर आले आहे.
अपुरी सेवक संख्या
नाशिक शहरातील कौटुंबिक हिंसेच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी विशेष भरोसा पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. गंगापूर रस्त्यावरील जुन्या पोलीस आयुक्तालयाच्या कार्यालयात सध्या भरोसा पथकाचे कामकाज सुरू आहे. या ठिकाणी पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांसह दोन हवालदार, दोन नाईक व दोन शिपाई हे सर्व महिला अधिकारी व सेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. या विभागाकडे येणार्या तक्रारींची संख्या, त्यांच्यावर होणारे कौन्सिलिंगचे प्रमाण पाहिले तर या ठिकाणी आणखी अधिकारी व सेवकांची गरज आहे.
पोलीस हेल्पलाईन
100 ही महाराष्ट्रातील टोल फ्री पोलीस हेल्पलाईन आहे. कोणत्याही प्रकारची हिंसा झाली तर या हेल्पलाईनवर मदत मिळते. स्त्रियांवर होणार्या हिंसेसंबंधी भारत सरकारची1091 टोल फ्री हेल्पलाईन आहे.
अगदी किरकोळ कारणापासून मोठ्या कारणापर्यंत कौटुंबिक हिंसा होत असते. करोनाकाळानंतर अशा प्रकारच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. वर्षाला साधारण 600-700 तक्रारी येत असतात. त्याच्यात महिला सुरक्षा कक्षाच्या वतीने दोन्ही पक्षांची बाजू ऐकून त्यांचे तीन ते चार वेळेला विशेष कौन्सिलिंग करण्यात येते. त्यात 50 टक्क्यांपेक्षा जास्त यश आम्हाला मिळते. त्यात निपटारा झाला नाही तर पुढे कायदेशीर कारवाई करण्याचे मार्ग असतातच.
दरम्यान, एकमेकांवर संशय तसेच एकमेकांकडून वाढलेल्या अपेक्षा व त्याची पूर्तता न होणे, सोशल मीडियाचा अतिवापर, पती-पत्नी एकमेकांचे फोन चेक करणे अशा विविध कारणांनी वाद निर्माण होऊन त्याचे पर्यावसान कौटुंबिक हिंसेत होते. मात्र पोलीस सक्षमपणे काम करत असून कोणाचेही घर उद्ध्वस्त होणार नाही याची काळजी घेतात. त्यासाठी विशेष कौन्सिलिंग करून वाद संपण्याचा प्रयत्न असतो.
– डॉ. प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त (गुन्हे)