मुंबई | Mumbai
राज्याच्या विधानसभा सभागृहात आज मोठा गदारोळ झाला. उपमुख्यमंत्री आणि नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या उत्तरावर प्रश्न विचारू न दिल्याने ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव आणि विरोधी बाकांवरील आमदार चांगलेच आक्रमक झाले. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला आमदार भास्कर जाधव हे उत्तर देण्याचा प्रयत्न करत होते. पण, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भास्कर जाधव यांना बोलू दिले नाही आणि सभागृह तहकूब करण्यात आले होते. यानंतर विधिमंडळाबाहेर येऊन भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदे आणि राहुल नार्वेकर यांच्यावर संताप व्यक्त केला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभेतील गटनेते भास्कर जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तरावर आक्षेप घेत राइट टू रिप्लाय अंतर्गत प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. मात्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नियमांचा दाखला देत ही परवानगी नाकारली. नार्वेकरांच्या निर्णयानंतर विरोधक आक्रमक झाले. त्याच दरम्यान ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या दिशेने हातवारे केल्याचा आरोप करत शिंदे गटाचे आमदार आक्रमक झाले.
भास्कर जाधव म्हणाले, “एकनाथ शिंदे हे उत्तर देत होते. आम्ही एकही शब्द बोललो नाही. खरेतर एकनाथ शिंदे यांच २९३ च्या प्रस्तावाचे भाषण नव्हते. महाराष्ट्राच्या बाहेर परभणी, ठाणे, शिक्षण, बांधकाम, पाणी योजनांचा विषयावर एकनाथ शिंदे बोलले नाहीत. फक्त एकनाथ शिंदे खोटे बोलले आहेत.
ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव म्हणाले, “सभागृहात बोलू दिले जात नाही. अध्यक्षकांनी सरकारला बरखास्त करावे आणि स्वतःच कामकाज करावे. अध्यक्ष दुतोंडी आहेत. अध्यक्ष स्वत:च सरकार असल्यासारखे वागतात. त्यामुळे विधानभवनाला आता लक्षवेधी भवन असे नाव द्यावे, असे म्हणत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नियमबाह्य काम केल्याचा आरोप देखील जाधव यांनी केला आहे.
एकनाथ शिंदेंवर सडकून टीका
“एकनाथ शिंदे म्हणतात, ‘कोरोना काळात खिचडीत घोटाळा केला आहे.’ पण, खिचडी करण्याचे कंत्राट ज्याच्या नावावर होते, तो संजय माशेलकर हा एकनाथ शिंदे यांच्या पक्षात आहे. तो शिंदेंच्या शिवसेनेचा पदाधिकारी आहे. त्या माशेलकरवर कुठलीही कारवाई नाही. मग, सूरज चव्हाण याला १४ महिने तुरूंगात टाकण्यात आले. आमच्या अंगाची लाही होते, जीव जळतो, पण संधी मिळत नाही. अटल सेतू काय शिंदेंच्या काळात झाला का? १९६३ पासून अटल सेतूचा इतिहास आहे. काय तुमची लायकी आहे? तुमचे कर्तृत्व काय आहे? वरळी सी लिंक बांधल्याचे सांगतात, हे काय तुम्ही बांधला का? मेट्रो तुम्ही आणली म्हणून सांगता. पण, मी राज्यमंत्री असताना मेट्रोसाठी पहिली सही केली होती. तुम्ही तेव्हा कुठे होता? उठसूठ उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले जातात. अरे तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत,” असा संताप भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर व्यक्त केला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





