रत्नागिरी | Ratnagiri
‘आठवेळा निवडणूक जिंकल्यानंतर थांबायचा विचार करावा असे वाटते,’ असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री भास्कर जाधव यांनी राजकीय संन्यास घेण्याचे संकेत दिले आहेत. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना, शिवसेना पक्षातून आपल्याला मंत्रिपदाची संधी मिळाली नाही, याबाबतची खंतही भास्कर जाधव यांनी आज बोलून दाखवली.
काय म्हणाले भास्कर जाधव?
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना, शिवसेना पक्षातून आपल्याला मंत्रिपदाची संधी मिळाली नाही, याबाबतची खंतही भास्कर जाधव यांनी आज बोलून दाखवली. तसेच, खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावर नाराजी दर्शवत ‘मला शिवसेना पक्षात भाषणे करायची संधी मिळते, तसेच पक्षाच्या हितासाठी मी जे करायचे ते करतो. पण, मी कुणाची हुजरेगिरी कर नाहीत, हा ला हा किंवा ना ला ना… असे म्हणणारा मी कार्यकर्ता आहे’, असेही भास्कर जाधव यांनी बोलून दाखवले. गुहागर मतदारसंघात आयोजित शिवसेना पक्षाच्या शिबीरानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
आता थांबायचा विचार करावा असं वाटतं
शिवसेनेचा शाखाप्रमुखच हाच शिवसेनेचा कणा होता, पण कुठेतरी शिवसेनेत शाखाप्रमुखच बाजूला होत असल्याचे मला दिसले, म्हणून त्याच अनुषंगाने आज शिवेसना पक्षाच्यावतीने शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यकर्ते कमी होत आहेत म्हणून निवृत्ती घ्यायचे काहीच कारण नाही. ३९ जागांपैकी मी एकटा निवडून आलो आहे, परंतु शेवटी आठ-आठ वेळा वेगवेगळ्या निवडणुका जिंकल्यानंतर असे वाटते की आता थांबायचा विचार करावा, यापेक्षा वेगळे कारण नाही, असे म्हणत भास्कर जाधव यांनी निवृत्तीच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिले. पण दुसऱ्या बाजूला कोकणात मी काम केले पाहिजे, मतदारसंघ ढवळून काढले पाहिजेत, मी स्वस्थ बसू नये अशी पक्षातल्या सर्वांची भावना आहे. त्यामुळे कोकणापासून पालघरपर्यंत काम करावे, असे वाटते. कधी कधी माझा मूळ स्वभाव उफाळून येतो. सिंधूदुर्गापासून काम करावे, असे वाटते असे भास्कर जाधव यांनी सांगितले.
संजय राऊत मला दरवेळी सावरण्याची भाषा करतात. पण, मला भाषण करायला मिळत नाही म्हणून मी नाराज होत नाही. सगळ्या गोष्टींचे मला चांगल भान आहे. पक्ष मला भाषण करायला देत नाही म्हणून मी नाराज असा संदेश देण्याचा संजय राऊत यांचा प्रयत्न असतो. मात्र, पक्षाकडूनही कधीही तसे होत नाही. व्यासपीठावर शिवसेनेतील ज्येष्ठ नेते असतात, आदित्य ठाकरे हेही असतात. तरीही मला तिसऱ्या क्रमांकावर भाषण करायची संधी दिली जाते. माझ्यानंतर संजय राऊत आणि त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाषण करतात, असे जाधव यांनी सांगितले. मला भाषण करायला मिळालं पाहिजे असं अजिबात म्हणणं नाही, भाषणाबद्दल नाराजीचा विषयच नाही, असेही जाधव यांनी स्पष्ट केले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




