10 ते 16 सप्टेंबर या आठवड्यात जन्मलेल्या व्यक्तींचे भविष्य
सौ. वंदना अनिल दिवाणे
10 सप्टेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर बुध, रवि, हर्षल या ग्रहांचा प्रभाव राहील. तुमची सूर्य रास कन्या आहे. बुद्धीमत्ता अतिशय तीक्ष्ण असल्याने ज्ञानग्रहण करणे सोपे जाईल. वैचारीक पातळी सामान्यांपेक्षा वरच्या दर्जाची राहील. निसर्गाचे आकर्षण वाटेल. कोणतेही करिअर निवडले तरी त्यात जीव तोडून मेहनत घ्याल. निरनिराळ्या भाषांवर प्रभुत्व राहील. अनेक विषयात रस असल्यामुळे जीवनातील बराच काळ निरनिराळ्या प्रकारच्या कामाचा अनुभव घेण्यात जाईल. आयुष्याच्या मध्यानंतर कोणत्या तरी एका व्यवसायात स्थिर व्हाल. वरिष्ठांची मर्जी संपादन करणे सहज शक्य होईल. त्यांच्या कृपाछत्राखाली उच्च पदावर आरूढ व्हाल. आर्थिक बाबतीत तुम्हाला धनप्राप्तीच्या अनेक संधी उपलब्ध होतील.
11 सप्टेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर बुध, चंद्र, नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास कन्या आहे. कल्पनाशक्ती अतिशय प्रगल्भ आहे. बुद्धी कुशाग्र असून प्रत्येक गोष्टीत बदल करण्याची हौस आहे. बौद्धिक कार्यात चांगले यश मिळू शकेल. व्यापारी उलाढालीत विशेष रस वाटणार नाही. साधी रहाणी व उच्च विचारसरणी अशी वृत्ती आहे. आपलेच घोडे पुढे दामटण्याऐवजी शांतपणने व धीमेपणाने जीवनाचे गाडे हाकणे तुम्हाला जास्त आवडते. बौद्धिक कामातून विपुल प्रमाणात धनप्राप्ती होईल. मोठ्या प्रमाणात व्यापार करणार्या कंपनीत पदाधिकारी झाल्यास बराच पैसा मिळेल. याशिवाय साहित्य क्षेत्रात प्रवेश केल्यास उत्तम लेखक, टीकाकार, शिक्षक अथवा प्रवास वर्णने लिहीणारा लेखक म्हणूनही उत्तम मानधन मिळू शकेल.
12 सप्टेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर बुध, गुरू या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कन्या आहे. महत्त्वाकांक्षा दांडगी आहे. जन्मतः असलेल्या परिस्थितीतून वर निघून त्यापेक्षा चांगली परिस्थिती प्राप्त करण्याची सगळी धडपड राहील. परंतू बुद्धीवर ताण पडून स्वास्थहानी होऊ नये याची खबरदारी घ्यावी. भोवतालच्या माणसांवर हुकूमत चालवणे आवडते. आर्थिक यश उत्तम राहील. तुम्ही ठरवलेले अंदाज सहसा चुकणार नाहीत. इतरांपेक्षा नेहमी एक पाऊल पुढेच असणार. आर्थिक बाबतीत कोणत्याच प्रकारची भिती नाही. तरी पण आर्थिक चिंता करण्याची सवय जाणारर नाही. एकाच वेळी अनेक उद्योग करून धनप्राप्ती होईल.
13 सप्टेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर बुध, नेपच्यून, सूर्य या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कन्या आहे. नेपच्यूनचा मुख्यतः प्रभाव राहील. त्याचाच परिणाम म्हणून की काय तुमचा बाणा स्वतंत्र राहील. इतरांच्या विचारांनी त्यांच्याबरोबर मिसळून काम करणे तुम्हाला जमणार नाही. शिवाय त्यामुळे जीवनात अनेक अडचणी निर्माण होतील. धलप्राप्तीसाठी स्वप्रयत्नावर अवलंबून रहावे लागेल. एकट्याने काम केल्यास विपुल धनप्राप्ती होईल. आर्थिक बाबतीत कागदपत्रांवर खोट्या सह्या करून फसगत होण्याची शक्यता आहे. स्वप्रयत्नाने धनप्राप्ती करावी.
14 सप्टेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर बुध,ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कन्या आहे. बुध ग्रहाच्या प्रभावाखाली असलेल्या व्यक्तीशी चांगले जमू शकेल. त्यामुळे गंमत अशी आहे की, स्वतःला एकाच वेळी अनेक कामात गुंतवून घ्याल. किंवा करिअरमध्ये अनेक प्रकारची कामे पत्कराल. करिअसमध्ये कितीही बदल झाले तरी पैसे मिळतच राहतील. पाणी तेरा रंग कैसा जिसमे मिलाया वैसा अशी आर्थिक बाबतीत वृत्ती राहील. पुष्कळवेळा केवळ भाग्याने धनप्राप्ती होईल. वार्षिक उत्पन्न चालू राहील.
15 सप्टेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर बुध, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कन्या आहे. बुधामुळे शुक्राचे सामर्थ्य वाढलेले आहे. बुधामुळे सर्वांशी सहानुभूतीने वागाल. विशेषतः ज्या व्यक्तीवर तुमचे विशेष प्रेम आहे. तिथे तुमचा उत्साह दांडगा राहील. मात्र याबाबतीत अनुभव एकाच वेळी दोन बोटीत बसल्यासारखा राहील. त्यापैकी एक व्यक्ती तुमच्यासाठी योग्यच असेल असे नाही. आपला संसार व जागेविषयी प्रेम वाटेल. आर्थिक आवक हा तुमच्यासाठी भाग्योदयकारक प्रश्न आहे. केवळ तुमचे नातेवाईकच नव्हे तर मित्रदेखील थोडीशी अडचण आली तरी स्वतःहून मदतीसाठी धावून येतील. वारसाहक्काने बरीच संपत्ती मिळेल.
16 सप्टेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर नेपच्यून, चंद्र, बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कन्या आहे. आदर्शवादी आहात. विचार उच्च स्तराचे असतील. कल्पनाशक्ती चांगली आहे. भौतिक सुखाचे फार आकर्षण आहे. तर्कावर उतरल्याशिवाय कोणत्याही गोष्टीवर विश्वास बसत नाही. मानसशास्त्र किंवा तशा प्रकारची शास्त्रे यांच्याविषयी आकर्षण वाटेल. पूर्वार्धात सुखसोयी प्राप्त करण्यात खर्च झाला तरी उत्तरार्धात वैभवाचा उपभोग घ्याल. आर्थिक बाबतीत सर्व सोयी उपलब्ध असूनही तुमची चिंता करण्याची सवय कमी होणार नाही.