Saturday, March 29, 2025
Homeभविष्यवेधपोळा : सर्जा राजाचा सण

पोळा : सर्जा राजाचा सण

बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलांची पूजा करतात. शेतीप्रधान या देशात व शेतकर्यांत या सणाला विशेष महत्त्व आहे. या वेळेस पावसाचा जोर कमी झालेला असतो. शेतात पीकधान्य झुलत असते. सगळीकडे हिरवळ असते. श्रावणातले सण संपत आलेले असतात. एकूण सर्वत्र आनंदाचे वातावरण असते.

या सणासाठी शेतकर्‍यांमध्ये उत्साह असतो. आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजशृंगार खरेदी करतात. बैल सजवितात गावाच्या सीमेजवळ (आखर) एक मोठे आंब्याच्या पानाचे तोरण करून बांधतात. त्याजवळ गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनया, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. या वेळेस पोळ्याची गाणी म्हणायची पद्धत आहे. त्यानंतर, मानवाईक (ज्याला गावात मान आहे तो-गावचा पाटील, श्रीमंत जमीनदार) यांच्यातर्फे तोरण तोडले जातेव पोळा फुटतो. नंतर बैल मारुतीच्या देवळात नेण्यात येतात. मग त्यांना घरी नेऊन ओवाळण्यात येते. असा हा पोळ्याचा सण आहे.पोळ्यास बैलपोळा असे देखील म्हणतात.

- Advertisement -

या दिवशी, बैलांचा थाट असतो. या दिवशी त्यांना कामापासून आराम असतो. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण देण्यात येते. पोळ्याला त्यांना नदी, ओढयात नेऊन धुण्यात येते. खोंडाला हळद व तुपाने शेकले जाते. त्यांच्या पाठीवर सुरेख नक्षीकाम केलेली झूल, सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा पायात तोडे, खायला गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य असतो. बैलाची निगा राखणार्‍या घरगड्यास नवीन कपडे देण्यात येतात.

शेतकरी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. शेतकर्‍याच्या घरी बैलांचे स्वागत करण्यासाठी सुवासिनी सडा व रांगोळ्या करतात. तर घरात चुलीवर लाडक्या पाहुण्यासाठी खरपूस पुरणपोळी तयार होत असते. दुपारी खळ्यात बैलाला आमंत्रित करण्यासाठी शेतकरी सपत्नीक वाजतगाजत जातात व त्याला अतिथी देवो भव:प्रमाणे घरी आणतात.

घरातील सुवासिनी बैलांची विधिवत पूजन करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य देतात. त्यासोबत त्यांच्या पुढे गहू-ज्वारीचे दान मांडतात. या दिवशी गावातील इतर घरातूनही बैलांना जेवणासाठी आमंत्रित केले जाते. शेतकर्‍यालाऔक्षण करून त्याला नारळ दिले जाते तर बैलांना पुरणपोळीचे जेवण दिले जाते. महाराष्ट्रातील काही गावामध्ये या दिवशी बैलांच्या शर्यतीचे आयोजन करून तेथे पोळा फोडला जातो.

ज्या शेतकर्याचा बैल पोळा फोडेल म्हणजेच शर्यत जिंकेल त्या बैलाच्या अंगावर ग्रामपंचायतीतर्फे झूल टाकली जाते व शेतकर्याच्या डोक्यावर फेटा बांधून त्याचा सन्मान केला जातो. त्यानंतर गावातून बैलांची सवाद्य मिरवणूक काढली जाते. अशा पारंपरिक पद्धतीने मोठया उत्साहपूर्ण वातावरणात संपूर्ण महाराष्ट्रात शेतकर्‍याचा जिव्हाळ्याचा सण पारंपरिक पोळा साजरा केला जातो.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Udayanraje Bhosale : “मुख्यमंत्री अन् सरकार बोळ्याने…”; उदयनराजेंचा सरकारला घरचा आहेर,...

0
मुंबई | Mumbai गेल्या काही दिवसांपासून रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावरुन (Waghya Statue) राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तर दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज ...