भेंडा | Bhenda
भेंडा-कुकाण्यासह 6 गावांच्या ग्रामपंचायतीकडे 34 लाख 83 हजार रुपयांची पाणीपट्टी थकली असून नळ पाणीपट्टी थकबाकी न भरल्याने पाणी व्यवस्थापन समितीने भेंडा-कुकाणासह 6 गावांच्या पाणी पुरवठ्यात कपात केली असून ऐन पावसाळ्यात 6 गावांतील जनतेला सध्याच्या परिस्थितीत 3 दिवसाआड पिण्याचे पाणी मिळत आहे.
नेवासा तालुक्यातील भेंडा येथे 1991 च्या जनगणनेनुसार 20,334 व्यक्ती तर 2030 ची प्रकल्पित लोकसंख्या 44 हजार व्यक्ती गृहित धरून दरदिवशी प्रतिमाणूस 55 लिटर शुद्ध पिण्याचे पाणी मिळेल या क्षमतेची भेंडा-कुकाणा व इतर चार गावांची ही नळ पाणी योजना आहे. मुळा धरणाच्या उजव्या कालव्याच्या उद्भव धरून ही योजना उभी राहिलेली आहे. सहा गावांना दोन महिने पुरेल इतके पाणी साठवण्यासाठी 260 दशलक्ष लिटर क्षमतेचा सिमेंट काँक्रिटचा पाणी साठवण तलावाची व्यवस्था असून शुद्धीकरण प्रकल्प आहे. ही योजना कार्यान्वित झाल्यापासून भेंडा येथील प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेतून भेंडा बुद्रुक, भेंडा खुर्द, कुकाणा, तरवडी, चिलेखनवाडी व अंतरवाली या 6 गावांना नळाद्वारे पिण्याचे शुद्ध पाणी मिळत आहे.
मात्र भेंडा, कुकाणा व इतर चार गावांच्या नळ पाणीपुरवठा योजनेची थकबाकी 34 लाख रुपये झाली आहे. त्यातच वीज बिल थकबाकी 22 लाख रुपये व मुळा पाटबंधारे विभागाची थकबाक़ी 13 लाख रुपये आहे. मुळा पाटबंधारे विभागाची थकबाक़ी वाढल्याने पाणी सोडण्यात आलेले नाही. पाणीपट्टी, वीजबिल, कर्मचारी पगार, क्लोरिन याचा महिन्याला सरासरी 4 ते 4.5 लाख रुपये खर्च येतो. पाटबंधारे विभागाने पाणीपट्टीत 42 टक्के तर महावितरण कंपनीने वीज बिलात 68 टक्के वाढ केली आहे. शिवाय थकबाकीचे प्रमाण वाढल्याने सध्या पावसाळा असूनही 3 दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे.
सन 2019-20 मध्ये पाणीपट्टी थकबाकी 30 लाख रुपयांवर गेल्याने संत ज्ञानेश्वर संयुक्त पाणी व्यवस्थापन समितीने दि.18 सप्टेंबरपासून थकबाकीदार गावांचा पाणीपुरवठा बंद केला होता. यावेळी सुद्धा भेंडा बुद्रुक, भेंडा खुर्द, कुकाणा, तरवडी, चिलेखनवाडी, अंतरवाली या 6 गावांच्या ग्रामपंचायतीकडे सुमारे 34 लाख रुपयांची पाणीपट्टी थकित आहे. संत ज्ञानेश्वर पाणी व्यवस्थापन समितीमध्ये पाणीपुरवठा होत असलेल्या 6 गावांचे सरपंच व ग्रामसेवक सदस्य आहेत. तरीही ग्रामपंचायत थकबाकी वाढल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
दैनंदिन नळ पाणीपुरवठ्यासाठी लागणारे गावनिहाय पाणी…
भेंडा बुद्रुक (15 लाख लिटर), भेंडा खुर्द (2 लाख लिटर), कुकाणा (15 लाख लिटर), चिलेखनवडी (1.25 लाख लिटर), अंतरवली (1.5 लाख लिटर), तरवडी (2.5 लाख लिटर).
गावनिहाय पाणीपट्टी थकबाकी-भेंडा बुद्रुक (10 लाख 57 हजार), भेंडा खुर्द (71 हजार), कुकाणा (14 लाख 6 हजार), अंतरवाली (84 हजार), चिलेखनवाडी (2 लाख 52 हजार), तरवडी (6 लाख 13 हजार). एकूण (34 लाख 83 हजार रुपये).
दरम्यान भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत रिक्षा फिरवून थकबाकी वसुलीचे प्रयत्न करत आहे. यापुढे प्रत्येक ग्रामपंचायतीने अनधिकृत नळजोडणी शोधून बंद करणे, थकबाकी वसुली प्रत्येक महिन्याला करणे, असे कठोर निर्णय घेऊन त्याची काटेकोर अंमलबजावणी केली पाहिजे, असे आवाहन पाणी व्यवस्थापन समितीने केले आहे.
भेंडा-कुकाणा व इतर चार गावांच्या नळ पाणीपुरवठा योजनेची थकबाकी 37 लाख रुपये झाली आहे.योजनेच्या तलावात थोडेच पाणी शिल्लक आहे.थकबाक़ी त्वरित न भरल्यास पाणीपुरवठा कधीही बंद होऊ शकतो. त्यामुळे लाभधारक ग्रामपंचायतींनी थकबाकी भरून सहकार्य करावे.
वैशाली शिवाजी शिंदे अध्यक्षा, संत ज्ञानेश्वर संयुक्त पाणी व्यवस्थापन समिती
आमच्यावर अन्याय का ?
नळ पाणीपट्टी नियमित भरणार्यांना नियमित पाणी मिळत नाही. त्यामुळे जे पट्टी भरत नाहीत त्यांच्याकडून ती वसूल करावी किंवा त्यांचे वैयक्तिक नळ जोड तोडून पाणीपुरवठा बंद करावा. प्रमाणिक करदात्यांवर अन्याय का? असा प्रश्न पाणी योजनेत सहभागी असलेल्या गावांतील लाभधारकांनी उपस्थित केला आहे.