अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात एका व्यक्तीने प्लॉट संबंधित सरकारी कामात समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी (27 एप्रिल) रात्री 11:20 वाजताच्या सुमारास घडली. किसन दादा शिंदे (वय 38, रा. भेंडा, पाटबंधारे ऑफीस जवळ, रस्तापूर रस्ता, ता. नेवासा) असे त्या व्यक्तीचे नाव आहे.
दरम्यान, रात्री उशिरा शिंदे हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात आला व त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने तेथे रात्र ड्यूटीवर असलेल्या पोलिसांमध्ये चांगलाच गोंधळ निर्माण झाला.
याप्रकरणी शिंदे विरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार अनिल झरेकर यांनी फिर्याद दिली आहे. किसन शिंदे व त्याच्या नातेवाईकांमध्ये प्लॉट संबंधी वाद आहे. त्यांना प्लॉट संबंधित सरकारी कामात समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी रविवारी रात्री पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले. त्यांनी 11.20 वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात स्वतःच्या अंगावर पेट्रोल सदृश पदार्थ ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला.
यावेळी त्याला तेथील ड्यूटीवर असलेल्या पोलिसांनी वेळीच रोखले, यामुळे पुढील अनर्थ टळला. भिंगार कॅम्प पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली. शिंदे याला ताब्यात घेतले व त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार रवींद्र टकले करीत आहेत.