अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी घरफोडी झाल्याची घटना समोर आली आहे. दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये चोरट्यांनी बंद घरे लक्ष करून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरले. या दोन्ही गुन्ह्यांची नोंद भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
ज्योती आजिनाथ खिळे (वय 34) यांच्या घराचे दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि बेडरूममधील कपाट उचकून सुमारे 58 हजार रूपयांची रोकड लंपास केली. ही घटना 29 एप्रिल ते 6 मे या कालावधीत घडली. या प्रकरणी ज्योती खिळे यांनी 6 मे रोजी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरूध्द घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी घटना भिंगार उपनगरातील महात्मा कॉलनीत घडली.
महात्मा कॉलनी येथील बरखा मनिष छजलानी (वय 40) यांच्या घरातून सुमारे 40 हजार रूपयांचे सोन्याचे झुमके चोरीला गेले. ही घटना 16 मार्च ते 18 एप्रिल या कालावधीत घडली असून, फिर्यादीने 5 मे रोजी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केलाआहे.