अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
सुप्रसिद्ध अभिनेते सनी देओल यांच्या गदर या गाजलेल्या चित्रपटाच्या सिक्वेलचे शुटींग नगर परिसरात सुरू झाले असून भेट देण्यासाठी शहरातील ‘मातब्बरां’चे पाय शुटींग लोकेशनच्या दिशेने वळली आहेत. काल रात्री खासदार डॉ.सुजय विखे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्यासह शहरातील काही नामी व्यापार्यांनी सनी देओल यांची भेट घेत शुटींगचा आनंद घेतला.
2001 मध्ये ‘गदर-एक प्रेमकथा’ हा चित्रपट रिलीज झाला होता. भारत-पाकिस्तान तणावात फुलणारी प्रेमकथा या चित्रपटातून मांडण्यात आली होती. सनी देओलचा आवेशी अभिनय आणि देशभक्तीचे संवाद यामुळे अनिल शर्मा दिग्दर्शित हा चित्रपट तिकिटबारीवर तुफान गाजला होता. करिअरसाठी फारसा फायदा झाला नसला तरी या चित्रपटामुळे अभिनेत्री अमिषा पटेल प्रसिद्धीच्या झोतात होती.
पुन्हा एकदा अनिल शर्मा ‘गदर-2’च्या निर्मितीत गुंतले आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चित्रपट चर्चेत आहे. सनी देओल, अमिषा पटेल पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करत आहेत. सोबत उत्कर्ष शर्मा, सीमरत कौत, लव्ह सिन्हा असे ताज्या दमाचे कलाकार चित्रपटासाठी कास्ट करण्यात आले आहेत. चित्रपटाची कथा 22 वर्ष पुढे सरकली असून दमदार कथानकामुळे चित्रपट प्रेक्षकांना नक्की आवडणार, असा विश्वास सनी देओल यांनी व्यक्त केला आहे.
या चित्रपटाच्या शुटींगचे महत्वपूर्व तीन आठवड्यांचे शेड्यूल नगर परिसरातील आहे. या काळात शहर परिसरातील महल, डोंगर, पठार अशा लोकेशनचा वापर शुटींगसाठी होणार आहे. काल बुधवारी चित्रपटाच्या शुटींगचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नगरचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील शुटींग टीमला शुभेच्छा देण्यासाठी पोहचले होते. सनी देओल हे डॉ.विखे यांचे लोकसभेतील सहकारी खासदार आहेत. त्यामुळे शुटींगसाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले असून काल रात्री दोघांनी लोकसभेतील आठवणींना उजाळा देत मनसोक्त गप्पा मारल्या. यावेळी उद्योजक नरेंद्र फिरोदिया, अक्षय कर्डिले, धनंजय जाधव आदी उपस्थित होते. तर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी सपत्नीक सनी देओल यांची भेट घेवून फोटोसेशन केले.
दरम्यान, चित्रपट सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार 22 दिवसांचे शुटींग शेड्यूल नगर परिसरात होणार आहे. डिसेंबर अखेर चित्रपटाचे शुटींग संपणार असून 2023 च्या पहिल्या तिमाहीत चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.