
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
भिंगार परिसरातील विजयलाईन चौकाजवळ सुरू असलेल्या ऑनलाइन बिंगो जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने धाड टाकून सात जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत संगणक, एलसीडी स्क्रीन, राऊटर, मोबाईल फोन, रोख रक्कम आदी असा एक लाख 81 हजार 260 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगारबंदी कायदा कलम 12 (अ) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सोमवारी (3 ऑगस्ट) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अहिल्यानगर-पाथर्डी रोडलगत एसएस स्पोर्ट्स शेजारी असलेल्या गाळ्यात ऑनलाइन बिंगो हारजीतीचा जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकला. या कारवाईत विशाल पांडुरंग पठारे, विशाल राजू गायकवाड, प्रमोद प्रेमपाल ठाकूर (तिघे रा. विजयलाईन चौक, भिंगार), अमोल अशोक घुसा (रा. नागरदेवळे, ता. अहिल्यानगर), मनीष बागुल (पूर्ण नाव माहित नाही, रा. सैनिकनगर, भिंगार), पांडुरंग त्र्यंबक कुत्तरवाडे (रा. सोनई, ता. नेवासा) आणि रॉनी व्हिन्सेट स्वामी (रा. बाराबाभळी, भिंगार) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत एक सीपीयू, एलसीडी स्क्रीन, यूपीएस, की-बोर्ड, माऊस, एअरटेल कंपनीचा राऊटर, एक्स्टेन्शन बोर्ड, तीन हजार 160 रूपयांची रोख रक्कम, मोबाईल असा एकूण एक लाख 81 हजार 260 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तोफखाना पोलिसांची तिरट जुगार कारवाई
शहरातील सपकाळ चौक परिसरात सुरू असलेल्या तिरट नावाच्या हारजितीच्या जुगार अड्ड्यावर तोफखाना पोलिसांनी रविवारी (2 ऑगस्ट) दुपारी धाड टाकून सात जणांना रंगेहाथ ताब्यात घेतले. कारवाईदरम्यान रोख रक्कम, जुगाराचे साहित्य आणि विविध कंपनीचे पाच मोबाईल फोन असा एकूण 42 हजार 370 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश रामचंद्र श्रीगादी, लखन सुरेश धनगर, व्यंकटेश पांडुरंग यंगल, अजय चंद्रकांत कोडम, गणेश व्यंकटेश कोंडा, लक्ष्मण रामलू वडलाकोंडा आणि दत्तात्रय भुमय्या नागुल यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




