Monday, May 20, 2024
Homeनगरआयशरच्या धडकेत मोटारसायकलवरील दोघे ठार

आयशरच्या धडकेत मोटारसायकलवरील दोघे ठार

भोकर |वार्ताहर| Bhokar

श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यातील भोकर (Bhokar) शिवारात श्रीरामपूर-नेवासा राज्य मार्गावर भरधाव आयशरने मोटारसायकलला धडक (Eicher Truck Hit Motorcycle) दिल्याने झालेल्या भिषण अपघातात (Accident) काकांच्या दहाव्याहून घरी परतत असलेले नेवासा (Newasa) तालुक्यातील निपाणी निमगाव येथील शेतकरी कुटूंबातील दोघा सख्या भावांचा गंभीर जखमी (Injured) होवून त्यांना उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. या अपघाताने निपाणी निमगाव गावावर शोककळा पसरली आहे.

- Advertisement -

अपघात (Accident) घडल्यानंतर जि.प. शाळेच्या प्रश्न पत्रिका घेवून जाणारा ट्रक राज्य मार्गाच्या साईड गटारमध्ये उलटला व ट्रक चालक पसार झाला. याबाबत रात्री उशीरापर्यंत तालुका पोलिसात गुन्हा दाखल (Filed a Case) करण्याचे काम सुरू होते. जखमींना दवाखान्यात हलविण्यासाठी परिसरातील तरूणांनी मदत केली.

श्रीरामपूर-नेवासा राज्यमार्ग क्र.44 वर काल शनिवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास नेवासा तालुक्यातील निपाणी निमगाव (Nipani Nimgav) येथील नवले कुटूंबातील कर्ते पुरूष असलेले सख्ख्ये भाऊ शरद विनायक नवले (वय-36) व अविनाश विनायक नवले (वय-30) हे दोघे आपल्या जवळील मोटारसायकल (क्र.एमएच 17 एक्यू 8685) हिने श्रीरामपूरकडून राहता तालुक्यातील काकांच्या दहाव्याहून निपाणी निमगाव येथे आपल्या घरी जात असताना समोरून नेवाशाकडून श्रीरामपूरकडे जिल्हा परिषद शाळांच्या इयत्ता तिसरी ते आठवीच्या पहिल्या सत्रातील प्रश्नपत्रिका घेवू चाललेला आयशर (क्र.एमएच 12 टी व्ही 4092) या भरधाव वाहनाने विरूद्ध दिशेने येवून या मोटार सायकलला जोराची धडक दिली व राज्य मार्गाच्या लगतच्या साईड गटारात जावून उलटला. ट्रक चालकाने प्रसंगावधान बघून ट्रकमधून बाहेर पडत पळ काढला.

हा अपघात झाल्याचे लक्षात येताच जवळच काळे वस्तीतील तरूण अरूण काळे, दिपक काळे व रावसाहेब काळे अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले. त्याचवेळी इतर वाहन चालकांबरोबरच येथील सोसायटीचे अध्यक्ष गणेश छल्लारे, संचीत गिरमे, धनगर समाज समितीचे तालुकाध्यक्ष राजु तागड, सावता परिषदेचे ज्ञानेश्वर शिंदे, झुंबर शिंदे, नानासाहेब काळे, प्रतिक काळे आदिंनी गंभीर जखमी नवले बंधूना रूग्णवाहिका पाचारण करून उपचारासाठी श्रीरामपूर येथील साखर कामगार रूगणलयात रवाना केले.

या नवले कुटूंबातील थोरले बंधू शरद नवले यांचा श्रीरामपूर (Shrirampur) येथील साखर कामगार हॉस्पीटलमध्ये उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर धाकटा अविनाश हा ही गंभीर जखमी असल्याने त्यास पुढील उपचारासाठी लोणी येथील प्रवरा हॉस्पीटल येथे नेत असताना हॉस्पीटलला पोहचण्यापूर्वीच त्यांचाही मृत्यू झाला. यातील थोरले शरद नवले हे नेवासा तालुक्यातील गळनिंबचे जावई आहेत तर अविनाश नवले हे श्रीरामपूर तालुक्यातील कारेगावचे जावई आहेत. मयत नवले बंधूंच्या पश्चात वृद्ध आई, वडीलांसह शरद यांची पत्नी, दोन मुली व एक मुलगा तर अविनाश यांची पत्नी एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.

अपघाताचे वृत्त समजताच तालुका पोलीस ठाण्याचे (Shrirampur Taluka Police Station) पो.नि.दशरथ चौधरी यांनी अपघातग्रस्त आयशर व मोटारसायकल पोलीस ठाण्यात रवाना करत वाहतुक सुरळीत केली. यावेळी त्यांच्या समवेत पोलीस हवालदार राजु त्रिभुवन, अर्जून बाबर, पोलीस पाटील बाबासाहेब साळवे, पोलीस मित्र बाबा सय्यद व गृहरक्षक दलाचे सुभान शेख यांनी तातडीने वाहने ताब्यात घेवून आयशर चालकाचा शोध सुरू केला. या आयशरमध्ये पहिल्या सत्राच्या प्रश्नपत्रिका असल्याचे समजताच अपघातस्थळी परिसरातील शिक्षकांनी मोठी गर्दी केली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या