Friday, November 22, 2024
Homeक्राईमभोकर येथील फ्रिस्टाईल हाणामार्‍या प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल

भोकर येथील फ्रिस्टाईल हाणामार्‍या प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल

भोकर |वार्ताहर| Bhokar

श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे जुन्या वादातून झालेल्या फ्री स्टाईल हाणामारी प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. निपाणीवाडगाव येथील महंमद पठाण यांनी पोलिसांत गुन्हा दाखल केल्यानंतर काल भोकर येथील रज्जाक शेख यांनी निपाणी वाडगाव येथील तीन जणांविरोधात तालुका पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. भोकर येथील शेख परीवाराचे नातेवाईक असलेलले निपाणीवाडगाव येथील पठाण परीवाराचे नातेसंबंध आहेत. सुमारे दोन-तीन वर्षांपूर्वी निपाणीवाडगाव येथील मुलगी भोकर येथील शेख कुटुंबात दिलेली आहे. या विवाहादरम्यान झालेल्या वादातील निपाणी वाडगाव येथील नातेवाईक गावात आल्याचे समजताच भोकर येथील त्या तरुणांचे पित्त खवळले अन् जुन्या वादाच्या निमित्ताने झालेल्या बाचाबाचीचे रूपांतर फ्री-स्टाईल हाणामारीत झाले.

- Advertisement -

या हाणामारीत लाकडी दांड्यांचा व लाकडांचा वापर करून एकमेकांची यथेच्छ धुलाई करण्यात आली. यावेळी गावातील मुख्य चौकात व राज्यमार्गावरून गावात जाणार्‍या रस्त्यावर काही काळ दंगल सदृश परीस्थिती निर्माण झाली होती. कोण कुणाला मारतयं अन् का मारतयं हे बराच काळ कुणालाच समजेना परंतु हाणामार्‍यांचा आवेश व रोष बघून येथील अनेक व्यापार्‍यांनी पहिल्यांदाच हाणामार्‍या सुरू असताना दुकाने बंद केल्याचे ग्रामस्थांनी पाहिलेे. याप्रकरणी निपाणी वाडगाव येथील महंमद पठाण यांनी भोकर येथील वसीम शेख, गुड्डू शेख, लाला शेख यांच्या विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या वादातील दोघा जखमींवर साखर कामगार हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.

तर भोकर येथील रज्जाक फत्तूभाई शेख यांनी काल तालुका पोलीस ठाण्यात निपाणी वाडगाव येथील चाँदभाई जाकीरभाई शेख, मोहंमद राजूभाई पठाण व इसाक चाँदभाई पठाण यांच्या विरोधात गुन्हा भा.न्या.सं.कलम 115(2), 352, 351(2) (3) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास हेडकॉन्स्टेबल राजू त्रिभुवन व कॉन्स्टेबल संतोष कराळे करत असून त्यांना हेडकॉन्स्टेबल संतोष करावेळे व पोलीस मित्र बाबा सय्यद हे सहकार्य करत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या