Friday, November 22, 2024
Homeनगरविविध विषयांवर भोकरच्या ग्रामसभेत वादळी चर्चा

विविध विषयांवर भोकरच्या ग्रामसभेत वादळी चर्चा

पोलीस संरक्षणामध्ये तीन तास चाललेल्या ग्रामसभेत विविध विषयांना मंजुरी

भोकर |वार्ताहर| Bhokar

जलजीवन योजनेचा वाढीव आराखडा, नवीन विकास कामांच्या निवीदा, पुलाचे झालेले निकृष्ट काम, विद्यालय व भोकर स्टँड येथे सुरू असलेला रोडरोमिओंचा वाढता उपद्रव, शॉपिंग सेंटरमध्ये, घरामध्ये पावसाचे गेलेले पाणी, खराब रस्ते आदी विषयांवर भोकर ग्रामसभेत चर्चा झाली. ग्रामविकास अधिकार्‍यांनी अचानकपणे ग्रामपंचायतीचे बोगस शिक्के व सहीचे दाखले येत असल्याचा आश्चर्यकारक खुलासा, उपसरपंचांनी आमच्या कामात कुणीही हस्तक्षेप करू नये, असा दिलेला धमकी वजा इशारा आणि आमचे काम निकृष्ट झाले तर राजीनामे देवू, तसेच आम्ही चांगलेच काम करू, आम्हाला समजावून सांगा, माझ्या पाठीशी रहा, अशी सरपंचांनी घातलेली साद अशा विविध विषयांवर पोलीस संरक्षणामध्ये तब्बल तीन तास चाललेल्या ग्रामसभेत अनेक विषयांना मंजुरी देण्यात आली.

- Advertisement -

भोकर येथील ग्रामसभा सरपंच शितलताई पटारे यांच्या अध्यक्षतेखाली तर अशोकचे माजी उपाध्यक्ष पुंजाहरी शिंदे, उपसरपंच सागर आहेर, रामदास शिंदे, काँग्रेस सेवा दलाचे तालुकाध्यक्ष सुदामराव पटारे, भाजपाचे तालुकाध्यक्ष भाऊराव सुडके, तालुका संघटक सतीश शेळके, असंघटीत कामगार नेते गणेश छल्लारे, सोसायटीचे चेअरमन अण्णासाहेब काळे, ग्रामविकास अधिकारी प्रदीप ढुमणे, सदस्य संदीप गांधले, गिरीष मते, ज्ञानेश्वर काळे, काळू गायकवाड, वेणूनाथ डूकरे, राजू लोखंडे, प्रताप पटारे, सचिन पोखरकर, सम्राट माळवदे व राहुल अभंग आदींच्या उपस्थितीत संपन्न झाली.
सभेच्या आरंभीच सुडके व शेळके यांनी अनेक ग्रामपंचायत सदस्य अनुपस्थित आहेत, त्याच बरोबर महावितरण प्रतिनिधी, ठेकेदार, तलाठी, कृषी सहाय्यक, आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित नसल्याचा मुद्दा मांडला. त्यावर आमचे काम अजेंडा बजावणे आहे, ते आम्ही केले.

सर्वांना अजेंडा बजावणी झालेली आहे, असा खुलासा ग्रामविकास अधिकारी यांनी केला. गेल्या ग्रामसभेत घनकचरा निर्मूलन प्रकल्प कार्यान्वित नाही, काम निकृष्ट असल्याने संबंधितास देयक अदा न करण्याचा ठराव झालेला असताना ग्रामसभेच्या परवानगीशिवाय देयक अदा कसे झाले? असा सवाल करताच पंचायत समिती अधिकार्‍यांनी पुर्णत्वाचा दाखला दिल्याने देयक अदा केल्याचा खुलासा झाला. संबंधित ठेकेदार व अधिकारी यांना पाचारण करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यावर आपण विशेष सभा बोलावून त्यांना खुलासा करण्यासाठी निमंत्रीत करू, असे ग्रामविकास अधिकार्‍यांनी सांगितले. जलजीवन योजनेचे काम आराखड्याप्रमाणे अपूर्ण असताना वाढीव आराखड्याचा प्रस्ताव ठेवू नका त्यास आमचा विरोधच आहे, अगोदर मूळ काम पुर्ण झाल्याचे दाखवा, अशी मागणी सतीश शेळके, भाऊराव सुडके, रामदास शिंदे व गणेश छल्लारे यांनी केली. याच दरम्यान रामदास शिंदे यांनी ज्या ठेकेदाराने गावातील अनेक कामे निकृष्ट केली त्यालाच पुन्हा दहा कामे द्यायचे कारण काय? असा प्रश्न उपस्थित केला.

यावेळी ठेकेदारी व निकृष्ट काम या विषयावर तासभर वादळी चर्चा झाली. त्यावर ग्रामविकास अधिकार्‍यांनी विशेष ग्रामसभा बोलावून खुलासा करण्यास भाग पाडू असे उत्तर दिले. गावातील विद्यालय व महाविद्यालयीन वेळेत विद्यालय परीसरात रोडरोमिओंचा उपद्रव वाढला आहे. श्रीरामपूर बस स्टँडपर्यंत जाण्याची यांची मजल गेलेली आहे, त्यामुळे मुलींना शाळेत जाताना मोठा मनस्ताप होतो. त्याला वेळीच आवर घाला, अन्यथा मोठा अनर्थ घडू शकतो, असा खुलासा भाऊराव सुडके यांनी केला. बस स्टँड पुन्हा मूळ जागेवर घ्या, ते निर्जन ठिकाणी गेल्यामुळे मुलींना असुरक्षीतता जाणवत आहे. त्यासाठी पोलिसांनी बसस्टँडवरील कॅमेरे चेक करून संबंधितांवर कारवाई करावी ,अशी मागणी सुडके यांनी केली. घरकुलाच्या रकमेसाठी चुकीचे बँक खाते दिल्याने पैसे वेळेत न मिळालेले भालके दाम्पत्यांनी आठवड्यात पैसे द्या, अन्यथा पती-पत्नी आत्मदहन करू असा इशारा देताच ते पैसे जिल्हा परीषदेकडून येतात त्यात आमचा कुठेही हस्तक्षेप नसतो, असा खुलासा सत्ताधार्‍यांकडून करण्यात आला.

आम्ही सर्व कामे चांगलीच करणार आहोत, पण ठेकेदारांनी पंचायत कार्यालयात येऊन दमदाटी करू नये, 15 व्या वित्त आयोगाच्या कामात कुणीही हस्तक्षेप करू नये, चांगली कामे झाली नाही तर राजीनामे देऊ, असा धमकी वजा इशारा देत उपसरपंच यांनी हुकूमशाही गाजविण्याचा प्रयत्न केला. त्यावर अनेकांनी आक्षेप घेत आम्ही तुम्हाला मत देवून आमचे प्रतिनिधीत्व दिले. म्हणजे तुम्ही हुकूमशहा नाही. सर्वांना विचारात घ्या, अन्यथा दुष्परीणाम होतील, असा इशारा अनेकांनी दिला. होणारी कामे उत्कृष्ट होतील, पण सर्वांनी सहकार्य करा, महिला सरपंच आहे. मला समजून घ्या. माझ्या पाठीशी उभे रहा, मी चांगलेच काम करवून दाखविल, अशी भावनिक साद यावेळी सरपंच शितलताई पटारे यांनी घातली. यावेळी ग्रमस्थ उपस्थित होते. तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल राजू त्रिभुवन, बाबा सय्यद व पोलीस पाटील बाबासाहेब साळवे यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

ग्रामपंचायतीचे शिक्के व खोट्या सह्यांचे दाखले येत आहेत. मी पाच दाखले पकडले आहेत, ते खोटे आहेत, ही बाब गंभीर असल्याने मी लवकरच पोलिसांत फिर्याद दाखल करणार असल्याचा खुलासा ग्रामविकास अधिकारी प्रदिप ढुमणे यांनी केला. यावर अनेकांनी आचंबीत होत संबंधितांवर लवकरात लवकर कारवाई करण्यास सर्वानुमते मंजुरी दिली.
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या