भोकर |वार्ताहर| Bhokar
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर शिवारातील पांढरेवस्ती येथे राहत्या घरासमोर बांधलेल्या कालवडीवर बिबट्याने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात कालवड गंभीर जखमी झाली. या परीसरात बिबट्याची मोठी दहशत निर्माण झाली आहे. वनविभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकर्यांकडून केली जात आहे.
भोकर शिवारात गेल्या अनेक वर्षांपासून बिबट्याचा हल्ल्यात अनेक पाळीव प्राणी बिबट्याचे शिकार झाले आहेत. परंतु वनविभागाच्या पिंजर्यात अद्यापपर्यंत एकही बिबट्या किंवा बिबट्याची मादी जेरबंद झालेली नाही. त्यामुळे वाड्या-वस्त्यावर राहणार्या शेतकर्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
बुधवार दि. 15 फेब्रुवारीच्या पहाटे 4.30 वाजेच्या सुमारास येथील मोठ्या ओढ्यालगत लक्ष्मीबाई नारायण पांढरे यांचे गट नं.470 मध्ये वस्ती करून राहत असलेले नारायण पांढरे यांच्या घरासमोर बांधलेल्या कालवडीवर बिबट्याने हल्ला चढविला; परंतु साखळी बांधलेली असल्याने बिबट्याला ती कालवड ओढून नेणे शक्य झाले नाही.
कालवडीच्या आवाजाने जाग्या झालेल्या लक्ष्मीबाई यांनी आरडा-ओरडा केल्याने बिबट्याने पळ काढला मात्र तोपर्यंत कालवड गंभीर जखमी झाली होती. या जखमी कालवडीवर उपचार सुरू आहेत. या परिसरातील बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकर्यांकडून केली जात आहे.