Sunday, June 14, 2026
HomeनगरAshok Kharat : पुराव्याअभावी भोंदू खरातला दोषारोपपत्रातून वगळले

Ashok Kharat : पुराव्याअभावी भोंदू खरातला दोषारोपपत्रातून वगळले

शिर्डीतील तरुण आत्महत्या प्रकरण

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

शिर्डीतील साई संस्थानचे कर्मचारी विकास रामदास दिवटे (वय 37) यांच्या आत्महत्येप्रकरणी एक मोठी कायदेशीर घडामोडी समोर आली आहे. सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळून केलेल्या या आत्महत्या प्रकरणात सुरुवातीला आरोपी म्हणून नाव असलेल्या मिरगाव येथील भोंदू बाबा खरात याला पोलिसांनी पुराव्याअभावी दोषारोपपत्रातून वगळले आहे. दरम्यान या प्रकरणातील उर्वरित तीन आरोपींविरुद्ध पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.
9 जून 2022 रोजी विकास दिवटे यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली होती. विकास हे साई संस्थानमध्ये नोकरीला होते. मात्र त्यांच्या पत्नीसोबत सुरू असलेल्या घरगुती वादामुळे ते प्रचंड मानसिक तणावाखाली होते. या वादात त्यांचे सासरे, मेहुणा आणि साडू हे त्यांना सातत्याने त्रास देत होते. विकास यांना त्यांच्या स्वतःच्या पत्नी आणि मुलाशी बोलू दिले जात नव्हते, तसेच त्यांना नोकरीवरून काढून टाकण्याची व जीवे मारण्याची धमकीही दिली जात होती.

- Advertisement -

या प्रकरणात धक्कादायक वळण तेव्हा आले, जेव्हा सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील एका भोंदू बाबाचे नाव समोर आले. फिर्यादी राजेंद्र दिवटे यांच्या तक्रारीनुसार, विकास यांना या बाबाकडे नेण्यात आले होते. तिथे या बाबानेही विकास यांना वारंवार मानसिक त्रास देऊन बदनाम करण्याची आणि नोकरी घालवण्याची धमकी दिली होती. आत्महत्येपूर्वी विकास यांनी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमध्येही या त्रासाचा उल्लेख होता.

शिर्डी पोलिसांनी याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता. प्राथमिक माहितीनुसार खरात याचे नाव आरोपींच्या यादीत होते. मात्र तपासादरम्यान खरात याच्याविरोधात भक्कम तांत्रिक किंवा प्रत्यक्ष पुरावे उपलब्ध होऊ शकले नाहीत. त्यामुळे विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्याला या प्रकरणातून तुर्तास वगळले असून उर्वरित तीन नातेवाईकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. दरम्यान शिर्डीतील एका गाजलेल्या शेतकरी फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांचा पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे. या व्यवहाराच्या वेळी उपस्थित असलेल्या साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, पोलीस प्रशासन या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.

ताज्या बातम्या

Nashik Vidhan Parishad Election : महायुतीची ‘सेफ हाऊस’ पॉलिटिक्स; शिवसेनेनंतर भाजपचेही...

0
नाशिक | Nashik स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीच्या (Nashik Vidhan Parishad Election) पार्श्वभूमीवर महायुतीने (Mahayuti) आपल्या नगरसेवकांना एकत्र ठेवण्याची रणनीती आखली आहे. शिवसेनेचे (शिंदे...