धुळे । प्रतिनिधी dhule
साक्री तालुक्यातील मौजे भामेर येथील शेतजमिनीची कौटूंबिक वाटणी करण्यासाठी निजामपूर मंडळ तहसील कार्यालयातील मंडळाधिकारी विजय वामन बावा यांना सात हजाराची लाच घेतांना धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज रंगेहात पकडले.
साकी तालुक्यातील मौजे भामेर येथे तक्रारदाराची गट नं. 43, 44 अशी शेत जमिन असून त्याची कौटूंबिक वाटणी करण्यासाठी निजामपूर मंडळ अधिकारी विजय वामन बावा यांची तक्रारदाराने भेट घेतली असता यासाठी 18 हजार रूपये लाच द्यावी लागेल, असे बावा यांनी सांगितले. त्यानंतर तडजोडीअंती 15 हजार रूपये देण्याचे ठरले. त्यापैकी अगोदर आठ हजार रूपये देण्यात आले. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानंतर एसीबीच्या पथकाने आज सापळा रचला. त्यावेळी बावा यांना सात हजारांची लाच स्विकारतांना पथकाने रंगेहात पकडले. बावा यांच्याकडून 15 हजार रूपये एसीबीच्या पथकाने जप्त केले आहेत.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण तसेच राजन कदम, शरद काटके, भूषण खलाणेकर, संतोष पावरा, भूषण शेटे, रामदास बारेला, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रविण पाटील, गायत्री पाटील, रोहिणी पवार, वनश्री बोरसे, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांच्या पथकाने केली.