Tuesday, September 17, 2024
Homeनगर95 कोटींतून होणार भूईकोट किल्ल्याचा विकास

95 कोटींतून होणार भूईकोट किल्ल्याचा विकास

जिल्हाधिकारी सालीमठ यांची स्थापनादिनी नगरकरांना भेट

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

शहराच्या वैभवात भर घालण्याच्यादृष्टीने ऐतिहासिक भूईकोट किल्ल्याच्या विकासाचा अनेक वर्षांपासूनचा प्रश्न सोडविण्यासाठी नुकतीच केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या सचिवांबरोबर बैठक होऊन त्यात किल्ला विकासाच्या 95 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे. राज्य सरकारमार्फत यासंदर्भातील सामंजस्य कराराचाही पहिला टप्पा झाला आहे व येत्या काही दिवसात प्रत्यक्ष कामास सुरूवात होईल, असे जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी जाहीर केले.

सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या रसिक ग्रुपच्यावतीने पंच शताब्दीचा वारसा लाभलेल्या शहराच्या स्थापना दिनाच्या पूर्वसंध्येला सोमवारी (27 मे) सायंकाळी भूईकोट किल्ल्याजवळ नयनरम्य निसर्गाच्या सान्निध्यात सुनहरी शाम.. शहर के नाम.. ही हिंदी-मराठी बहारदार गीतांची सुरेल मैफल रंगली. यावेळी जिल्हाधिकारी सालीमठ बोलत होते. रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलुलकर यांच्या संकल्पनेतून आयोजित या कार्यक्रमात नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांचा सेवापूर्तीनिमित्त नगरवासियांच्यावतीने विशेष नागरी सत्कार जिल्हाधिकारी सालीमठ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार संग्राम जगताप, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे, डॉ.विद्युल्लता शेखर पाटील यांच्यासह लष्करी, पोलीस अधिकारी व विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.

शहराच्या 534 व्या स्थापना दिनानिमित्त उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते हवेत फुगे सोडण्यात आले. यावेळी सालीमठ म्हणाले, शहराच्या विकासात भर घालत येथे काम करताना खूप समाधान व अभिमान मला वाटतो. अनेक अडचणींवर मात करत जिल्ह्याचे व नागरिकांचे प्रश्न सोडवत आहे. नागरिकांनी छोट्या-छोट्या गोष्टीतून शहराच्या विकासासाठी व स्वच्छतेसाठी हातभार लावावा, असे आवाहनही त्यांनी केले. डॉ. शेखर पाटील यांनी पोलीस खात्यातील प्रदीर्घ कारकीर्दीची शिदोरी उलगडत आलेले बरे-वाईट अनुभव व केलेल्या मोठ्या पोलिसी कारवायांना उजाळा दिला. अंगावरील खाकी वर्दीने मला प्रतिष्ठा दिली व सर्वात मोठी समाजसेवा करण्याची संधी खाकीने दिली आहे, असे सांगून स्वलिखित चारोळीतून आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या