Wednesday, November 13, 2024
Homeनाशिकयेवल्यात भुजबळांचे कुटुंब रंगले प्रचारात

येवल्यात भुजबळांचे कुटुंब रंगले प्रचारात

येवला । प्रतिनिधी | Yeola

येवला विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार तथा अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ आणि त्यांचे कुटुंबिय प्रचारात सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या पत्नी, मीनाताई, पुत्र तथा विधान परिषदेचे आमदार पंकज भुजबळ, स्नुषा विशाखा हे सर्वच विकासाचा भुजबळ पॅटर्न राबविण्यासाठी मतदारसंघातील कानाकोपरा पिंजून काढत आहेत. जनतेचीही त्यास मोठी साथ लाभत आहे. त्यामुळे ही बाब अतिशय चर्चेची ठरत आहे.

- Advertisement -

येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातून सलग पाचव्यांदा प्रतिनिधित्व करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ सज्ज झाले आहेत. येवला मतदारसंघातील गेल्या वीस वर्षातील विकासकामांचा लेखाजोखा मांडणारी विकासपर्व ही माहिती पुस्तिका आणि ध्वनीचित्रफित सध्या मतदारांमध्ये आकर्षण ठरत आहे. दोन दशकांमध्ये येवल्याचा कसा कायापालट होत गेला ते याद्वारे प्रतित होत आहे. परिणामी, यंदा भुजबळ यांना अधिकाधिक मताधिक्य मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, या प्रचारकार्यात त्यांचे संपूर्ण कुटुंब सक्रिय झाले आहे. ही बाब पंचक्रोशीत चर्चेची ठरली आहे.

येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँगेस पार्टी, भाजप, शिवसेना शिंदे गट, आरपीआय आठवले गट यांच्यासह महायुती घटक पक्षांचे अधिकृत उमेदवार म्हणून छगन भुजबळ हे जनतेसमोर जात आहेत. त्यांच्यापाठोपाठ त्यांच्या पत्नी मीनाताई या सुद्धा प्रचारात सक्रिय झाल्या आहेत. त्यांचे पुत्र तथा विधान परिषद आमदार पंकज भुजबळ यांनी गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघात गाठीभेटींचा धडाका लावला आहे. व्यापारीसह विविध समाज घटकांच्या भेटी ते घेत आहेत. विधानसभा मतदारसंघात प्रत्यक्ष घराघरांत जाऊन पंकज हे छगन भुजबळ यांना मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत.

येवल्याचे विकास पुरुष आणि कैवारी अशी भुजबळ यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या प्रचार कार्यात त्यांच्या स्नुषा विशाखा या सुद्धा मागे नाहीत. जिल्हा परिषदेच्या विविध गटात जाऊन त्या प्रचार कार्य करीत आहेत. ग्रामीण महिलांशी संवाद साधताना वेगळा अनुभव त्यांना येत आहे. छगन भुजबळ यांनी केलेल्या कार्याची प्रचिती येतानाच मतदारांचा उत्साह आणि भुजबळ यांच्याविषयीचे प्रेमही दिसून येत आहे. अनेक गावांमधील महिलांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा छगन भुजबळ यांनी उतरविला आहे.

घराघरात पिण्याचे पाणी नळाद्वारे पोहचल्याने महिला वर्गात अतिशय समाधानाचे वातावरण आहे. डोक्यावरुन हात फिरवतात तेव्हा सौ. विशाखा या देवगाव गटात गेल्या असता त्या आश्चर्यचकित झाल्या. एका घरातील वृद्ध महिलेने चक्क सौ. विशाखा यांच्या डोक्यावरुन हात फिरवितानाच तुम्हा भुजबळ कुटुंबियांना दीर्घायुष्य लाभो, जनतेची तुम्ही अशीच सेवा करीत राहो, असे आशीर्वाद या महिलेने कृतज्ञतापूर्वक दिले. हे पाहून सौ. विशाखा यांनाही गहिवरुन आले. तसेच, उपस्थितांमध्येही हा सर्व प्रसंग अतिशय चर्चेचा ठरला. भुजबळ कुटुंबियांनी विकासाचे राजकारण कसे केले याचा प्रत्यय गावोगावी येत असल्याने पाचव्यांदा छगन भुजबळ हे किती विक्रमी मतांनी विजयी होतील, याचा अंदाज बांधला जात आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या