Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्याआज मराठी भाषा आणि जीएसटी भवनाचे भूमिपूजन

आज मराठी भाषा आणि जीएसटी भवनाचे भूमिपूजन

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

गुढीपाडवा ( Gudhipadava ) अर्थात हिंदू नववर्षाचा मुहूर्त साधत आज मुंबईत नव्या दिमाखदार शासकीय वास्तूंंची गुढी उभारली जाणार आहे. दक्षिण मुंबईतील चर्नी रोडवर मराठी अस्मिता आणि अभिमानाचा मानबिंदू ठरणारे मराठी भाषा भवन ( Marathi Bhasha Bhavan ) आणि वडाळ्यात जीएसटी भवनाचे ( GST Bhavan) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray )यांच्या हस्ते भूमिपूजन ( Bhumipujan )होत आहे. या दोन वास्तूंमुळे मुंबईच्या वास्तू वैभवात भर पडणार आहे.

- Advertisement -

जवाहर बालभवन चर्नी रोड येथे सकाळी ११ वाजता मराठी भाषा भवन या मुख्य केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन होईल. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह मराठी भाषामंत्री सुभाष देसाई, मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख, मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, लोकसभा सदस्य अरविंद सावंत, विधानसभा सदस्य मंगलप्रभात लोढा उपस्थित राहणार आहेत.

मराठी भाषा भवनाचे मुख्य केंद्र दक्षिण मुंबई परिसरात आणि उपकेंद्र ऐरोली, नवी मुंबई येथे बांधण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला होता. मराठी भाषा भवन आणि मराठी भाषा उपकेंद्रांचे बांधकाम महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून होणार आहे.

मराठी भाषा भवन मुख्य केंद्र उभारणीसाठी जवाहर बाल भवन येथील भूखंडावरील शालेय शिक्षण विभागाचे बांधकाम वगळता रिक्त भूखंड विनामोबदला मराठी भाषा विभागास देण्याचा निर्णय झाला आहे. सुमारे २ हजार १०० चौ.मी. क्षेत्र मराठी भाषा भवनास मिळणार आहे. अंदाजे १२६ कोटी रुपये एवढा खर्च मराठी भाषा भवन उभारणीसाठी लागणार आहे.

मराठी भाषा भवनाविषयी……

मराठी भाषा भवन हे तळमजला अधिक सात मजल्याचे असून त्यात तळघर देखील असेल.

संकल्पनेनुसार पहिल्या मजल्यावर एक खुले सार्वजनिक मंच असेल. मरीन ड्राईव्हपासून या मंचापर्यंत पायऱ्यांची मालिका जाईल.

इमारतीमध्ये २०० आसन क्षमतेचे बहुउद्देशीय सभागृह, १४५ क्षमतेचे अॅम्फी थिएटर, चार मजल्यांवर प्रदर्शनासाठी जागा आणि एक मजला प्रशासकीय आणि कार्यालयीन जागा असेल.

· चार मजल्यांच्या प्रदर्शन दर्शिकेला चार विभागांमध्ये वर्गीकृत केले आहे. मराठी भाषेचा इतिहास आणि तिच्या उत्क्रांतीचा प्रवास इथे बघता येणार आहे.

· हा नकाशा अभ्यागतांकडून त्यांच्या मूळ स्थानासह प्रत्येक वैयक्तिक संकेतस्थळ आणि व्यक्तिमत्त्वाचा सखोल अभ्यास करण्यासाठी डिजीटल पद्धतीने वापरता येईल.

प्रस्तावित जीएसटी भवन इमारतीचे भूमीपूजन

राज्य कर विभागाच्या नियोजित वडाळा-मुंबई येथील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) भवनाच्या नवीन इमारतीचे भूमीपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते, अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली तर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सकाळी ९ वाजता होणार आहे.

या भूमीपूजन कार्यक्रमाला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार राहूल शेवाळे,आमदार कॅ.आर. तमिळ सेल्वन, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. प्रस्तावित इमारत उपनगरीय रेल्वे, मेट्रो, मोनोसह सार्वजनिक वाहनाने पोहचण्यासाठी मध्यवर्ती ठिकाणी असून जीएसटी कर्मचारी आणि करदात्यांच्या सोयींची संपूर्ण काळजी या इमारतीत घेण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या