खडका, ता.भुसावळ –
तालुक्यातील किन्ही येथे ‘आपला गाव आपला विकास’ अंतर्गत ग्रामसभेचे आज दि.७ रोजी सकाळी ११ वाजता आयोजन करण्यात आले होते.
यात ग्रामस्थांनी गावातील ठप्प विकास कामे, पदाधिकार्यांनी १४ व्या वित्त आयोगाच्या निधीची परस्पर संगनमताने विल्हेवाट लावली यासह गावातील सफाईचा प्रश्न, कर्मचार्यांचे वेतन, सौचालय अनुदानाचे बोगस लाभार्थींच्या मुद्यावर ग्रामसभेत ग्रामस्थांनी गोंधळ घातल्याने ही ग्रामसभा रद्द करण्यात आली.
यामुळे गावात काही काळ तणावाचे वातावण निर्माण झाले होते. ग्रामसभा सरपंच हर्षा येवले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती. यावेळी उपसरपंच प्रदीप कोळी, ग्रा.पं. सदस्य नलिनी पाटील, आशा तायडे, पुष्पा बाविस्कर, सुरेखा चौधरी, सुनंदा बोंडे, छाया सुरवाडे, किरण घुले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामसभा वादळी होणार असल्याच्या शक्यतेमुळे ग्रामस्थानी मोठ्या संख्येत हजेरी लावली होती. यामुळेच सभेसाठी पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला होता. यावेळी तालुक्याचे पो.नि. रामकृष्ण कुंभार,यांच्यासह पोलिस कर्मचार्यांनी कडक बंदोबस्त ठेवला. गावात स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा उडाला आहे. ग्रा.पं.च्या मुख्य प्रवेशद्वारासह गावात ठिक ठिकाणी कचर्याचे ढिग दिसून येत असल्याची नाराजी ग्रामस्थांमधून व्यक्त करण्यात आली.