लाखो-हजारो वर्षांच्या कालचक्रात मानवची उत्क्रांती होत गेली. मानव कसा निर्माण झाला ? आजच्या मानवापर्यंत तो कसा उत्क्रांत होत आला? अशा अनेक मानव उत्क्रांतीशी केंद्रित प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न जगात सतत सुरू असलेला आपण पाहतो. यासंदर्भात विविध सिद्धांत सदैव मांडले जातात. एक सजीव म्हणून मानव प्रजातीची उत्पत्ती- उत्क्रांती याविषयी आजही सर्वमान्य एकच असा सिद्धांत सांगता येत नाही.
एक प्रजाती म्हणून मानवाविषयीचे हे गूढ जसे कायम आहे. तसेच या मानवाच्या मनातील एका गूढाचा शोध देखील हजारो वर्षांपासून सतत सुरू आहे. हे गूढ म्हणजे त्याच्या मनातील मोह किंवा हव्यास. मानवी मनातील हे गूढ उकलण्याचा प्रयत्न अनेक संत-महात्म्यांनी केला.
जगात जे काही वाईट वा अमंगल घडते, त्याचे मूळ म्हणजे मोह. मानवी जीवनातील दुःखाचा उगम म्हणजेही मोह. रामायण अथवा महाभारत घडण्याचे कारण देखील मोहच. अशा मोहाचा सखोल शोध सर्व संत-महात्म्यांनी घेतला. त्यांच्या सर्व संशोधनातून ‘मोहत्याग करा’ एवढाच संदेश ते देऊ शकले. त्यांचा संदेश प्रत्येकाने ऐकला,त्यांना महान मानले,त्यांची पूजा केली इत्यादी इत्यादी. असे बरेच काही सांगता येते.
एवढे सारे करूनही गेला नाही,तो म्हणजे मानवाचा मोह. एवढे ‘मोहपुराण’ सांगण्याचा कारण की,ज्या अमेरिकेची बखर आपण वाचत आहोत,त्या अमेरिकेच्या निर्मितीत हा मोहच दडलेला आहे. हा मोह होता सोन्याचा. नव्याने शोधलेल्या भूखंडावर प्रचंड सोन्याचे साठे आहेत. या मोहाने सन १६०७ मध्ये संयुक्त स्टॉक कंपनी ( Joint Stock Company ) च्या माध्यमातून १४३ इंग्रज अमेरिकेच्या धरतीकडे निघाले. सुमारे तीन हजार सागरी मैलांचा हा प्रवास. अत्यंत खडतर आणि जीवघेणा.
नशीब आजमावयला निघालेल्या प्रत्येकाचे मन प्रचंड सोन्याच्या प्राप्तीसाठी अधिर झालेले. त्यामुळे कोणत्याही धोक्याची वा संकटाची पर्वा त्यांना रोखू शकत नव्हती. इंग्लंडची भूमी सोडतांना १४३ असलेल्यांपैकी जेमतेम १०० लोकांनाच अमेरिकेच्या धरतीला स्पर्श करता आला. सागरी प्रवासात त्यांच्यातील ४० जणांना मृत्यूने अपयशी ठरवले. मृत्यूला पराभूत करणा-या या सुपर १०० मध्ये इंग्रज उमरावांचे पुत्र, सैनिक,व्यापारी आणि हमाल यांचा समावेश होता. अमेरिकेच्या धरतीवर पोहचलेल्या या शंभर भाग्यवानांना,भाग्याची साथ तेथे पोहचपर्यतच लाभली.
व्हर्जिनीया नदीच्या विस्तीर्ण पात्रातून,जेम्स नदीच्या पात्रात त्यांनी प्रवेश केला. अखेर जेम्सच्या किना-यावरची एक जागा त्यांनी निवडली आणि तेथे आपली पहिली वसाहत स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यातला प्रत्येक जण सोनं मिळवण्यासाठी तर आलच होता;परंतु भविष्यात ही वसाहत बहरल्यावर आपण तिचे प्रमुख बनू किंवा सोन्याच्या व इतर वस्तूंच्या व्यापारात प्रचंड नफा मिळवू अशा महत्वकांक्षा ही त्यांच्या मनात रुंजी घालत होत्या. अतोनात परिश्रम कराव्या लागणाऱ्या शेतीचा विचार त्यांच्या मनात दूर-दूरपर्यंत नव्हता.
अमेरिकेच्या भूमीवर आलेल्या या पाहुण्यांचे सर्वप्रथम तेथील निसर्गानं स्वागतच केले. त्यामुळे इंग्लंडची पहिली वसाहत जेम्स टाऊनच्या उभारणीत या सुपर शंभरचा उत्साह ओसांडून वाहत होता. त्यांना निसर्गही साथ देत होता. हा काळ मात्र अत्यंत अल्प ठरला. कारण त्यांची येथे येण्याची वेळच चूकली होती. हया प्रदेशातील हिवाळयाला लवकरच सुरवात झाली. इंग्रज तसे शीत प्रदेशातीलच रहिवाशी. असे असले तरी ईथला हिवाळा मात्र वेगळाच होता. उणे १८ अंश सेल्सियसपर्यंत जाणारे तापमान आणि बेफाम हिमवर्षाव त्यांनी प्रथमच अनुभवला. हिमयुग कसे असेल ? याची कल्पना त्यांना पुरेपूर आली. अशा हिवाळयाशी सामना करण्यासाठी योग्य तो निवारा आणि त्याप्रकारची वस्त्रं या पाहुण्यांकडे असणे शक्य नव्हते. नवीन भूमीवर निवारा उभारावा लागणार होता आणि असल्या थंडीपासून रक्षण करणारी वस्त्रं त्यांच्याकडे नव्हती.
हे संकट कमी म्हणून की काय, सोबत आणलेल्या अन्नाचा साठाही संपत आला. बर्फाच्छादित भूमीवर अन्न मिळण्याची कोणतीच शक्यता नाही. निसर्गाशी कठोर व जीवघेणा संघर्ष प्रारंभ झाला. हिवाळा संपला अन उन्हाळा अवतरला. आपण कल्पना केलेले नंदनवन खरे कसे आहे, याची प्रचीती एव्हाना येऊ लागली. ही रमणीय स्वप्नभूमी म्हणजे ओसाड आणि दुष्काळग्रस्त भूप्रदेश आहे, याचे भान आले. कल्पित स्वर्गातील नरक यातनांना प्रारंभ झाला. शेती करण्यासाठी या स्वर्गात केवळ पाच महिन्यांचा कालावधी उपलब्ध होता.
उमरावांची पोर,व्यापारी,सैनिक व हमाली करणारे लोक यांना शेती करण्याचे ज्ञान असण्याचा प्रश्नच नव्हता. कष्टकरी हमाल व सैनिक सोडले तर अंगमेहनत काय चिज आहे,हे इतरांच्या कितीतरी पिढयांना माहित नव्हते. एका बाजूला अन्नाचा प्रश्न होता. समुद्र किनारा असल्याने पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष. जे पाणी पिण्यासाठी उपलब्ध होते ते पिण्यायोग्य नाही. घाणेरड्या पाण्यातून काविळ,कॉलरा अशा साथीच्या रोगांचा आहेर मिळत होता. दुस-या बाजूला स्थानिक जमातींच्या म्हणजे रेड इंडियन्सच्या वस्त्या.
तिकडे जाणे म्हणजे हाताने मृत्यूला आमंत्रण देणे. अशी ‘एका बाजूला आड अन दुस-या बाजूला विहिर’ अशी अवस्था झाली. समुद्र किनारी जगणे कठिण होते आणि तेथून दूर जाणे रेड इंडियन्समुळे धोक्याचे होते. जेम्स टाऊनची उभारणी बाजूलाच राहिली आणि उभारनाऱ्यांच्याच अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला. असे एक वर्ष सरले. सन १६०८ मध्ये सुपर शंभर पैकी केवळ ३८ जगण्याच्या संघर्षात यशस्वी झाले. परंतु ते केवळ जिवंत होते. त्यांची जगण्याची सर्व उमेद संपली होती. तसेच सोन्यात खेळण्याचे स्वप्नही धुळीला मिळाले होते. आता मातीत खेळावे लागणार होते.
निराश,हताश व वैफल्यग्रस्त ३८ लोकांमध्ये एका व्यक्तीच्या मनाने उभारी घेतली. स्वतःला आणि इतरांना जगवण्यासाठी नव्या दमाने संघर्ष करण्यास तो उभा ठाकला. हा व्यक्ती होता जॉन स्मिथ. जसे अनेक नेते प्रतिकुल परिस्थिती निर्माण करतात. तसेच अत्यंत प्रतिकुल परिस्थिती अनेकदा नेत्यांना जन्म देत असते. जॉन स्मिथचा दुर्दम्य आशावाद, श्रमावर असलेला अढळ विश्वास आणि बायबलच्या वचनांवरची श्रद्धा, येथे कामी आली. ‘जो श्रम करणार नाही त्याला भाकरी मिळणार नाही’,हे बायबलचे वचन त्याने मंत्राप्रमाणे उपयोगात आणले. त्याची आठवण सगळ्यांना करुन दिली.
अंगमेहनत माहित नसणा-या इंग्रजांना श्रमाची सक्ती केली. प्रत्येकाला कामाची जबाबदारी वाटून दिली. प्रत्येकाने नेमून दिलेले काम केलेच पाहिजे असा दंडक निर्माण केला आणि त्याची कठारेपणे अमंलबजावणी केली. समुद्र किनारासोडून आतल्या बाजूस स्थलांतर करण्याची योजना आखली. त्यानुसार पिण्यासाठी योग्य पाणी असणा-या झ-यांजवळ तो आपल्या लोकांना घेऊन गेला. तेथे राहण्यासाठी निवारा निर्माण करणे आणि पोट भरण्यासाठी शेती करणे यांचे महत्व त्याने सर्वांना पटवून दिले.
जमीन खोदून सोन काढण्याची स्वप्न पाहत या भूमीवर आलेल्यांना, जमिनीची मशागत करुन शेतकरी जे सोने पिकवतो. तेच खरे आणि जगण्यासाठी एकमेव उपयुक्त सोने. हे नक्कीच समजले असणार. जॉन स्मिथबाबत एक रोमांटिक कथा वा दंतकथा ही प्रचलीत आहे. एकदा जॉन स्मिथला ‘पौहाटन’ नावाच्या स्थानिक जमातीने पकडले. त्याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. त्यावेळी या जमातीच्या प्रमुखाच्या मुलीने त्याचे प्राण वाचवले. या प्रसंगाने इंग्रज लोकांचे या जमातीबरोबर मैत्री व सलोख्याचे संबंध निर्माण झाले. यामध्ये एखादी सुप्त प्रेमकथा देखील दडलेली असू शकते.
हिंदी चित्रपटांमध्ये असे प्रसंग अनेक वेळा रंगविण्यात आले आहेत. जॉन स्मिथच्या नेतृत्वामुळे जेम्स टाऊन स्थिरावत होते. जगण्याची नवी उमेद बळावत होती. संथपणे का होईना जेम्स टाऊन विस्तारू लागले. स्मिथने स्थानिक जमातींशी सौहार्दपूर्ण व दृढ संबंध प्रस्थापित करण्यात यश प्राप्त केले. त्यांच्याकडून अन्न तर मिळवलेच, मात्र त्यांच्यासाठी नवीन असलेल्या उप-यांविषयी सद्भावना निर्माण करण्यातही तो यशस्वी ठरला.
केवळ ३७ गर्भगळीत लोकांच्या भरोशावर जॉन स्मिथने जन्मासोबतच शापित ठरलेले जेम्स टाऊन टिकवले,जगवले आणि विस्तारले. याला कोणी त्याचे असामान्य नेतृत्व व व्यक्तिमत्व म्हणेल,तर कोणी बायबलच्या वचनाचा करिष्मा म्हणेल. हे ज्याच्या त्याच्या दृष्टीकोणाचे स्वातंत्र्य आहे. जॉन स्मिथ असला तरी जेम्स टाऊन अजूनही शापितच राहणार होते. सोन्याच्या शोधात येणा-यांचे अजूनही खत होणारच होते.
– प्रा. डॉ. राहुल हांडे,
(लेखक धर्म, इतिहास व साहित्य यांचे अभ्यासक आहेत)