नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी अभिनेता शाहरूख खान आणि गौरी खान यांच्या मालकीच्या रेड चिलिज एंटरटेनमेंटसह नेटफ्लिक्स आणि इतर पक्षांविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला आहे. आर्यन खानच्या वेब सीरिज, ‘बॅड्स ऑफ बॉलिवूड’ विरुद्ध दाखल केलेल्या २ कोटी रुपयांच्या मानहानीच्या खटल्यात न्यायालयाने त्यांना तात्काळ अंतरिम दिलासा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. न्यायमूर्ती पुरुषेंद्र कुमार कौरव यांच्या खंडपीठाने शुक्रवारी सुनावणी झाली. त्यात दिल्ली उच्च न्यायालयाने समीर वानखेडे यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे.
न्यायालयाने खटल्यातील ‘देखभालक्षमता’ अर्थात ‘हा खटला दिल्लीच्या अधिकारक्षेत्रात दाखल करण्यायोग्य आहे की नाही’, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि याच कारणास्तव सध्या तरी कोणताही दिलासा देता येणार नाही, असे स्पष्ट केले. न्यायालयाने समीर वानखेडे यांना विचारलं की “हे मुंबईतील प्रकरण असताना तुम्ही ही याचिका दिल्ली उच्च न्यायालयात का दाखल केली? दिल्लीत याची सुनावणी अपेक्षित असेल तर कोणत्या आधारावर ही सुनावणी घेतली जावी त्याची कारणे विषद करा.” न्यायमूर्ती पुरुषेंद्र कुमार कौरव म्हणाले, “राष्ट्रीय राजधानीत कारवाईची अपेक्षा का व्यक्त करत आहात?” एका वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे.
‘बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या सीरिजमध्ये समीर वानखेडेंसारखी हुबेहुब दिसणारा एक अभिनेता आहे. समीर वानखेडे यांनी कॉर्डेलिया क्रूझवरुन आर्यन खानला ड्रग्जप्रकरणात अटक केली होती. जवळपास महिनाभर आर्यन खान तुरुंगात होता. त्यानंतर त्याला क्लीन चिट देण्यात आली होती. आता ‘बॅड्स ऑफ बॉलिवूड’मध्ये दाखवलेली नक्कल पाहून समीर वानखेडेंनी थेट कोर्टात धाव घेतली होती. त्यांनी याचिकेत आरोप केला की एका विशिष्ट दृश्यातून त्यांची खिल्ली उडवण्यात आली आहे. आता हाय न्यायालयाने यावर दिलेल्या निर्णयाने समीर वानखेडेंच्या पदरी निराशा आली आहे.
न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, हा खटला त्याच्या सद्य स्वरूपात दिल्लीत दाखल करण्यायोग्य नाही. त्यामुळे, जोपर्यंत याचिकेतील ‘कॉझ ऑफ ॲक्शन’ बाबत आवश्यक दुरुस्ती केली जात नाही, तोपर्यंत कोणताही अंतरिम आदेश दिला जाणार नाही. यावर न्यायालयाने तोंडी टिप्पणी केली की, “तुमची याचिका दिल्लीमध्ये दाखल करण्यायोग्य नाही. मी ती फेटाळू शकतो. तुमचा युक्तिवाद असा असता की, तुमची बदनामी दिल्लीसह अनेक ठिकाणी झाली आहे आणि सर्वात मोठे नुकसान दिल्लीत झाले आहे, तर आम्ही विचार केला असता.” न्यायालयाच्या या भूमिकेनंतर समीर वानखेडे यांचे वकील याचिका दुरुस्त करण्यासाठी वेळ मागितला. न्यायालयाने त्यांना दुरुस्ती करण्याची परवानगी दिली आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे समीर वानखेडे यांना आता सर्वप्रथम याचिकेतील त्रुटी दूर करून ती दिल्लीत कशी वैध ठरते, हे सिद्ध करावे लागणार आहे. तोपर्यंत वेब सीरिजच्या प्रदर्शनावर कोणताही परिणाम होणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





