दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना एक प्रश्न हमखास विचारला जातो. ‘पुढे तुम्ही काय करणार? काही ठरवले आहे का?’ या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना माहितीच असतील असे नाही. त्यांना आवडणार्या गोष्टी आणि करिअरच्या वाटा यात काही संबंध असू शकतो, हेही अनेकांच्या गावी नसते. विद्यार्थ्यांशी पत्राद्वारे गप्पा मारणारे ‘आवड-निवड’ हे नवे सदर.
विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो,
मागील भागात आपण अमेरिकेची वारी करून श्री. ठाणेदार यांचे कर्तृत्व जाणून घेतले. प्रथमेशच्या आवडीविषयी पडलेल्या प्रश्नांविषयीही जाणून घेतले. आता प्रथमेशने आपला मोर्चा आपल्या मोठ्या दादाच्या सूचनांकडे वळविला. त्याला आता त्याच्या दादाने कागदात कोणकोणत्या आवडी लिहिल्यात हे जाणून घेण्याची उत्सुकता लागली होती. त्याने कागदाची घडी उघडली आणि त्यात लिहिले होते. वस्तूंचे ऑपरेशन करणे, लष्कराच्या भाकर्या भाजणे, पसार होणे. हे वाचताच प्रथमेश त्याच्या बाबांना म्हणाला, अहो बाबा, मी त्याला आवड लिहायला सांगितले. वाक्प्रचार किंवा मुहावरे नाही लिहायला सांगितले! हे बघ! तुमचे कोडवर्डस् स्लँग लँग्वेज वगैरे काही असते ना! ते तुम्हालाच ठाऊक. मला त्यातले काहीच कळत नाही. ते तू तुझ्या दादालाच विचार.
बाबांनी असे सांगताच प्रथमेश कागद घेऊन त्याच्या दादाकडे पळाला. काकूने दरवाजा उघडताच त्याने काकूला विचारले, काकू, दादा कुठे आहे? का रे! रोज माझ्याकडे खाऊसाठी लाडीगोडी लावत असतोस आणि आज तुला दादा हवा आहे. काय काम काढले दादाकडे. आज मी गरमागरम धिरडे केले आहेत खाणार का? काकू, धिरडे तर मी खाणारच पण आधी दादाला भेटतो आणि मग येतो धिरडे खायला. पळ पटकन स्टडीरूममध्ये नाहीतर दादा कॉलेजला निघून जायचा. काकूची आज्ञा पाळून प्रथमेश दादाच्या स्टडी रूमकडे पळाला आणि दादाला पाहून म्हणाला, का रे दादा! तू माझ्या आवडी लिहायचे सोडून, भलतेच काय लिहून दिले. हे बघ प्रथू! मला जे वाटले तेच तर लिहिले आहे. दादा, तू तर वाक्प्रचार, मुहावरे लिहून दिलेत. माझी आवड तर कुठेच लिहिली नाही? अस्सं आहे का? वस्तूंचे ऑपरेशन करणे म्हणजे मिक्सर, ग्राइंडर, फॅन, मोबाइल यासारख्या वस्तू बिघडल्यात की, तू त्या खोलतो आणि दुरुस्त करून पुन्हा पूर्ववत चालू करतोस की नाही. मग हे वस्तूंचे ऑपरेशन नाहीतर काय!
लष्कराच्या भाकर्या भाजणे म्हणजे कोणताही मोबदला न घेता अडचणीत असणार्या प्रत्येक व्यक्तीला मदत करणे, हा तुझा स्वभाव आहे; त्यामुळे तू सर्वांचा लाडका आहेस की नाही. आणि पसार होणे म्हणजेच तू सायकलवर टांग मारताच क्षणात प्रसार होतोस. आता मला सांग, या सर्व गोष्टी करायला तुला आवडते की नाही! दादा, यू आर अ ग्रेट! कळली मला तुझी गुगली. कोपरापासून नमस्कार तुला! थँक्यू माय डियर दादा! आता तू , मला मस्का काही लावू नकोस. तुला काही विचारायचे असेल तर संध्याकाळी कॉलेजमधून आल्यावर बोलूया! तोपर्यंत धिरड्याच्या वासाने प्रथमेशच्या तोंडाला पाणी सुटले नि काकूच्या हातच्या गरमागरम धिरड्यांवर ताव मारायला सुरुवात केली. चला तर मग विद्यार्थ्यांनो, प्रथमेश धिरड्यांवर ताव मारीत आहे आणि त्याचा दादा कॉलेजला गेला तोपर्यंत आपण प्रथमेशच्या आवडींवरून करिअरच्या वाटा शोधूया नि मग भेटूया पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत खूप धमाल करा.