Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याआमदार अपात्रता प्रकरणात काँग्रेसची उडी; विधानसभा अध्यक्षांकडे केली मोठी मागणी

आमदार अपात्रता प्रकरणात काँग्रेसची उडी; विधानसभा अध्यक्षांकडे केली मोठी मागणी

मुंबई | Mumbai

शिवसेनेतील बंडखोरीनंतर हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात गेलं. यात पक्ष आणि पक्षचिन्ह कुणाचं इथपासून तर बंडखोर आमदार कोण आणि त्यांच्यावर काय कारवाई करायची यावर सुनावणी सुरू आहे. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयातील या सुनावणीचं लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभाअध्यक्षांना निर्णय घेण्यास सांगितले. यानंतर आता विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी होत आहे. अशातच विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या सुनावणीबाबत मोठी मागणी केली आहे. त्यांनी याबाबत विधानसभा अध्यक्षांना पत्रही दिलं आहे.

- Advertisement -

विजय वडेट्टीवार म्हणाले, अपात्र आमदारांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात जेव्हा खटले चालतात त्यावेळी ते लाईव्ह सगळ्यांना बघायला मिळतं. आज महाराष्ट्रात एवढा मोठा घटनाक्रम झाला आहे. घटनातज्ज्ञही यावर गांभीर्याने लक्ष ठेऊन आहेत. महाराष्ट्राचंही या सुनावणीकडे लक्ष आहे. अशा परिस्थितीत विधानसभा अध्यक्ष जी सुनावणी करणार आहेत ती लाईव्ह करावी. विधानसभा अध्यक्षांनी बंडखोर आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी लाईव्ह करावी. जेणेकरून काय चाललं आहे हे लोकांना समजेल आणि सत्य परिस्थिती समोर येईल. कोण काय बाजू मांडतोय हेही समजेल. म्हणून आम्ही या सुनावणीचं प्रक्षेपण लाईव्ह करावं अशी मागणी केली आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं.

काय आहे नेमकं प्रकरण?

गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. शिवसेनेत दोन गट पडले. पक्षातील अनेक आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर जे आमदार शिंदे गटात गेले आहेत, त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करावी अशी मागणी उद्धव ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात करण्यात आली होती. सध्या हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या