श्रीगोंदा । प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अहमदनगर जिल्ह्यात मोठा धक्का बसलाय. महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अनुराधा नागवडे व प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी पदाचे राजीनामा देऊन शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत आज (बुधवार) दुपारी हातात शिवबंधन बांधले. यावेळी तालुक्यातील शेकडो नागवडे समर्थक यावेळी उपस्थित होते.
श्रीगोंदा तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते शिवाजीराव नागवडे यांचे पुत्र राजेंद्र नागवडे व अनुराधा नागवडे यांनी काँग्रेस पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटामध्ये प्रवेश केला होता. अनुराधा नागवडे या जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका देखील आहेत.
काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या देखील त्या जिल्हाध्यक्ष होत्या. विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांनी त्यांना उमेदवारी देण्याबाबत आश्वासन दिले होते. मात्र महायुतीकडून आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी जाहीर झाली. यामुळे नागवडे यांनी अजित पवार यांची साथ सोडली.
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार की उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जाणार हे अजून स्पष्ट झालेले नाही. या दोन्ही पक्षांनी या जागेवर आपला हक्क सांगितला आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून प्रवेश करून मशाल या चिन्हावर उमेदवारी करण्याची पूर्ण तयारी अनुराधा नागवडे यांनी केले आहे. तर शरद पवार यांच्या पक्षाकडून माजी आमदार राहुल जगताप हे देखील प्रबळ दावेदार आहेत. यामुळे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोज नाट्यमय घडामोडी घडत असल्याचे दिसून येते.