दिल्ली | Delhi
बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून राष्ट्रीय लोकशाही(एनडीए) आघाडी आणि महागठबंधनकडून जोरदार प्रचार सुरू आहे.
याचदरम्यान, बिहारचे पुढील मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार असल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना केला आहे. अमित शाह बोलतांना म्हणाले, “राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) बिहार विधानसभा निवडणुकीत दोन-तृतीयांश बहुमत मिळेल. मुख्यमंत्रीपदासाठी या ठिकाणी ‘जर-तर’ असणार नाही. बिहारमध्ये नितीशकुमार हेच पुढील मुख्यमंत्री असतील, याची आम्ही सार्वजनिकरित्या घोषणा केली आहे आणि आम्ही याला बांधील आहोत. जरी भाजपाने जदयूपेक्षा जास्ता जागा मिळवल्या तरीही.” तसेच “बिहारच्या लोकांना डबल इंजिनचे सरकार मिळणार आहे. एक राज्यात नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली तर दुसरे केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली.” लोकजनशक्ती पार्टीच्या एनडीएतून बाहेर पडण्याच्या निर्णयावर शाह म्हणाले, “लोजपाला आम्ही पुरेशा जागा दिल्या होत्या मात्र तरी देखील ते बाहेर पडले. हा त्यांचा निर्णय आहे आमचा नाही.” असे त्यांनी स्पष्ट केले.
बिहार निवडणूक 3 टप्प्यात पार पडणार आहे. 28 ऑक्टोबर, 3 नोव्हेंबर आणि 7 नोव्हेंबर या तीन दिवशी मतदान होणार असून 10 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.