पाटणा | Patna
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने बहुमताने विजय मिळवल्यानंतर बिहारमध्ये सध्या नवीन सरकार स्थापनेच्या प्रक्रियेला वेग आला आहे. बिहारच्या नवीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची नावे जवळजवळ निश्चित झाली असून अंतिम निर्णय एनडीए विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत घेतला आहे.
आज भाजपच्या झालेल्या विधीमंडळ बैठकीत सम्राट चौधरी यांची नेतेपदी निवड करण्यात आली आहे आणि विजय सिन्हा यांची उपनेते पदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे नितीश कुमार हे आता १० व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहे. तर सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा उपमुख्यमंत्रीपदी कायम राहणार आहे. उद्या होणाऱ्या शपथविधी सोहळ्याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे.
उद्या नव्या सरकारचा शपथविधी
आज झालेल्या बैठकीत उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि बिहार भाजपा निरीक्षक केशव प्रसाद मौर्य, सह-निरीक्षक खासदार साध्वी निरंजन ज्योती, केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल, प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल, ज्येष्ठ नेते धर्मेंद्र प्रधान आणि विनोद तावडे उपस्थित होते. या बैठकीत मोठ्या संख्येने नवनिर्वाचित आमदार आणि एमएलसी देखील सहभागी झाले होते. त्यांची विधीमंडळ नेते पदी निवड करण्यात आली असून विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री नितीश राज्यपालांना भेटून राजीनामा सादर केला आहे. त्यानंतर गुरुवारी नवीन सरकारचा शपथविधी समारंभ होईल.
पाटण्यातील ऐतिहासिक गांधी मैदानावर शपथविधी समारंभ होणार आहे. या कार्यक्रमाची व्यापक तयारी सुरू आहे. एनडीएचे अनेक वरिष्ठ नेतेही या समारंभात सहभागी होतील. स्वतः नितीश कुमारांनी मंगळवारी या सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी गांधी मैदानाला भेट दिली होती.
बिहारच्या राजकारणातील नवीन सरकारच्या स्थापनेचा नवा अंक सुरु होणार आहे. गृहमंत्री अमित शहा आज पटना येथे शपथविधीपूर्वीच्या बैठकांमध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचतील. त्यानंतर नितीशकुमार उद्या गांधी मैदानावर १० व्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. हा समारंभ सकाळी ११.३० वाजता सुरू होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या सोहळ्याला उपस्थित राहतील.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




