नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
बिहारचे सिंघम अशी ओळख असलेले मराठमोळे आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी पोलीस सेवेतून राजीनामा दिला आहे. शिवदीप लांडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली. १८ वर्ष पोलीस दलात सेवा केलेल्या शिवदीप लांडे बिहारमधील सिंघम म्हणून ओळखले जातात.
दोन आठवड्यांपूर्वी त्यांनी पूर्णिया आयजी पदाची जबाबदारी स्वीकारली होती. यानंतर लगेचच त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आहे. तिरहुतसारख्या मोठ्या भागातून पूर्णियाला पाठवल्याने ते नाराज होते अशी चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी लेडी सिंघम म्हणून प्रसिद्ध असलेल्या आयपीएस अधिकारी काम्या मिश्रा यांनीही वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिला होता.
गुरुवारी आयपीएस शिवदीप लांडे यांनी सोशल मीडियावर राजीनामा दिल्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी गणवेशात तिरंग्याला सलाम करतानाचे छायाचित्र शेअर केले आहे. शिवदीप लांडे यांनी लिहिले आहे की, माझ्या प्रिय बिहार, गेली १८ वर्षे सरकारी पदावर काम केल्यानंतर आज मी पदाचा राजीनामा दिला आहे. एवढ्या वर्षात मी बिहारला माझ्या आणि माझ्या कुटुंबापेक्षा वरचढ मानले आहे. सरकारी कर्मचारी असताना माझ्या काही चुका झाल्या असतील तर मी त्यांची माफी मागतो. आज मी भारतीय पोलीस सेवेचा (आयपीएस) राजीनामा दिला आहे, पण मी बिहारमध्येच राहीन आणि भविष्यातही बिहार माझे कार्यस्थान राहील.
शिवदीप लांडे हे अकोल्याचे आहेत. त्यांनी तिरहुत विभाग ( मुझफ्फरपूर ) कोसी विभागाचे उपमहानिरीक्षक आणि बिहारमधील अररिया, पूर्णिया आणि मुंगेर जिल्ह्यांमध्ये पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे. शिवदीप लांडे यांचे बिहारमध्ये चाहते आहे. युथ आयकॉन म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर विविध राजकीय पक्षांनी त्यांच्याशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. आपल्या पक्षात येण्याच्या ऑफर त्यांना मिळू लागल्या आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा