पाटणा । Patna
प्रसिद्ध निवडणूक विश्लेषक आणि जन सुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांना पोलिसांनी अटक केली आहे. बीपीएससी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य केल्या जाव्यात म्हणून प्रशांत किशोर मागच्या चार दिवसांपासून आंदोलनाला बसले होते.
आज पहाटे त्यांना अटक करण्यात आली. प्रशांत किशोर आणि पक्षाचे इतर कार्यकर्ते मैदानावर झोपले होते. पहाटे ४ च्या दरम्यान पोलीस आले आणि त्यांना अटक केली. प्रशांत किशोर यांना पोलीस म्हणाले चला आमच्या बरोबर यायचं आहे तुम्हाला. त्यावेळी जनसुराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला. ज्यानंतर पोलिसांनी प्रशांत किशोर यांना अटक केली.
पोलिसांनी ताब्यात घेण्याआधी प्रशांत किशोर बीपीएससी अनियमिततांसंदर्भात म्हणाले की, ते ७ जानेवारीला उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. त्यांनी राष्ट्रीय जनता दलचे नेते तेजस्वी यादव यांनाही विरोध करण्याच आवाहन केले आहे. “तेजस्वी यादव एक मोठे नेते आहेत. ते विरोधी पक्षाचे नेते आहेत. विरोधी पक्ष या नात्याने माझ्याजागी त्यांनी या आंदोलनाचे नेतृत्व करायला पाहिजे होते. त्यांनी या विरोध प्रदर्शनाचे नेतृत्व करावे” असे आवाहन प्रशांत किशोर यांनी यावेळी केले.
तर, राजकारण कधीही करता येऊ शकते. पण इथे आमच्या पक्षाचा कोणताही बॅनर नाहीये, असे प्रशांत किशोर यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले. पहाटे पोलिसांनी प्रशांत किशोर यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना एम्समध्ये नेण्यात आले. परंतु, या ठिकाणी त्यांनी कोणतेही उपचार करण्यास स्पष्टपणे नकार दिला.




