दिल्ली । Delhi
बिहारमध्ये विधानसभा निवडणुका जवळ येत असताना राजकीय घडामोडींना वेग आला आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि जेष्ठ नेते आरसीपी सिंह यांनी त्यांचा पक्ष ‘आप सबकी आवाज़’ प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षात विलीन केला आहे. या निर्णयामुळे राज्यातील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता असून, एनडीए आणि इंडिया आघाडी दोघांपुढे नवी डोकेदुखी निर्माण होऊ शकते.
सध्या बिहारमध्ये भाजपा-जद(यू) आणि राजद-काँग्रेस या दोन प्रमुख गटांमध्ये थेट लढत होण्याची शक्यता होती. मात्र आता जन सुराजनेही तिसऱ्या पर्यायाच्या रूपात निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्धार केला आहे. प्रशांत किशोर यांनी राज्यातील सर्व 243 विधानसभा मतदारसंघांत उमेदवार उभे करण्याचं जाहीर केलं आहे. किशोर यांनी गेल्या काही महिन्यांत राज्यभर जिल्हानिहाय दौरे करत विविध समाजघटकांशी संवाद साधला आहे. त्यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोघांवरही विकासाच्या मुद्द्यावरून जोरदार टीका केली आहे. शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार या प्रमुख समस्यांवर त्यांनी आवाज उठवला आहे.
आरसीपी सिंह यांचा बिहारच्या राजकारणात विशेष प्रभाव आहे. ते मूळचे कुर्मी समाजातील असून एकेकाळी IAS अधिकारी होते. मुख्यमंत्री नीतीश कुमार यांचे ते एकेकाळी निकटवर्तीय मानले जात होते. रेल्वेमंत्री असताना नीतीश कुमार यांच्या कार्यकाळात त्यांनी प्रशासकीय मदत केली होती. 2010 मध्ये त्यांनी सिव्हिल सेवा सोडून जद(यू) मध्ये प्रवेश केला आणि दोन वेळा राज्यसभेवर निवडून गेले. केंद्रात मंत्रिपद भूषवले. मात्र 2021 नंतर नीतीश कुमार यांच्याशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी ‘आप सबकी आवाज़’ हा स्वतःचा पक्ष स्थापन केला होता. आता हा पक्ष जन सुराजमध्ये विलीन करून त्यांनी प्रशांत किशोर यांच्यासोबत नवे राजकीय पर्व सुरू केलं आहे.
प्रशांत किशोर यांनी स्पष्ट शब्दांत लालू प्रसाद यादव आणि नीतीश कुमार यांच्यावर टीका केली आहे. “जर या नेत्यांनी खरोखर विकासावर लक्ष दिलं असतं, तर बिहारची अवस्था अशी झाली नसती,” असं वक्तव्य करून त्यांनी जनतेला नवा पर्याय देण्याचा निर्धार दर्शवला आहे. या नव्या घडामोडींमुळे बिहारच्या राजकारणात तिसऱ्या आघाडीची शक्यता वाढली आहे. जन सुराजची ताकद, आरसीपी सिंह यांचं नेतृत्व, आणि प्रशांत किशोर यांचा रणनीतीचा अनुभव — हे आगामी निवडणुकीत काय परिणाम घडवतात, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहणार आहे.