अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहरात आणि आसपासच्या परिसरात दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांवर कोतवाली पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन सराईत चोरट्यांना जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून 6 लाख 25 हजार रूपये किमतीच्या तब्बल 24 दुचाकी जप्त करण्यात आला आहे. तांत्रिक तपास, सीसीटीव्ही विश्लेषण व गुन्हे शोध पथकाच्या सततच्या माहिती संकलनातून ही मोठी कामगिरी झाली.
असिफ इकबाल सय्यद (वय 38, रा. रंगार गल्ली, अहिल्यानगर, हल्ली रा. आलमगीर, भिंगार) व आझाद ऊर्फ आज्या हारून शेख (वय 32, रा. आलमगीर, भिंगार) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी दुचाकी चोरी प्रकरणांची उकल करण्यासाठी गुन्हे शोध पथकाला विशेष सूचना दिल्या होत्या. त्यानुसार उपनिरीक्षक गणेश देशमुख व त्यांच्या पथकाने कोतवाली हद्दीत चोरी झालेल्या दुचाकींचे सीसीटीव्ही फुटेज गोळा करून त्याचे तांत्रिक विश्लेषण केले. त्यात संशयित इसम असिफ इकबाल सय्यद याचा सहभाग स्पष्ट झाला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपल्या साथीदारासोबत केलेल्या सलग चोरीची कबुली दिली.
असिफ सय्यद याच्या चौकशीत त्याचा साथीदार आझाद उर्फ आज्या हारून शेख याचा सहभाग उघडकीस आला. पोलिसांनी जामखेड येथून आझाद शेख याला ताब्यात घेऊन कोतवाली येथे आणले. दोघांनी मिळून केवळ कोतवाली हद्दीतच नव्हे तर नेवासा, भिंगार कॅम्प परिसरात मिळून एकूण 24 दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. सखोल विचारपूस करताच दोघांनी लपवून ठेवलेल्या सर्व दुचाकी पंचनामा करून जप्त करण्यात आल्या.
ही कारवाई निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक देशमुख, अंमलदार बाळकृष्ण दौंड, वसिम पठाण, शाबीर शेख, विशाल दळवी, विनोद बोरगे, वाघचौरे, दीपक रोहकले, सत्यम शिंदे, शिरीष तरटे, दत्तात्रय कोतकर, अभय कदम, सुरज कदम, अमोल गाढे, अतुल काजळे, सचिन लोळगे, राम हंडाळ, अतुल शेंडे, अतुल लाटे, गुलाब शेख, महेश पवार, महिला अंमलदार दरंदले, तोरडमल, पंडीत, मोबाईल सेलचे अंमलदार राहुल गुंड्डू यांच्या पथकाने केली.




