अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
सावेडी नाका येथील शोरूमसह श्रमिक नगरमधून दुचाकी चोरणार्या चोरट्याला तोफखाना पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने भिस्तबाग महालाजवळ सापळा रचून जेरबंद केले. त्याच्या ताब्यातून एक लाख सहा हजार रुपये किंमतीच्या दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. उमेश दिलीप गायकवाड (वय 23, रा. सपकाळ चौक, भिंगारदिवे मळा, अहिल्यानगर) असे त्याचे नाव आहे. चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी एक व्यक्ती भिस्तबाग महाल परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना गुरूवारी (13 मार्च) मिळाली होती.
त्यानुसार त्यांनी गुन्हे शोध पथकाला कारवाईचे आदेश दिले. पथकाने सापळा रचून उमेश गायकवाड याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील सुझुकी दुचाकी सावेडी नाका येथील शोरूममधून चोरल्याचे त्याने सांगितले. तसेच, श्रमिक नगर, बालाजी मंदिर परिसरातून एक दुचाकी चोरी केल्याचेही त्याने चौकशीत सांगितले. पोलिसांनी या दोन्ही दुचाकी हस्तगत करून त्याला अटक केली आहे. त्याच्या चौकशीत दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. निरीक्षक कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील, पोलीस अंमलदार सुनील शिरसाठ, सुनील चव्हाण, अहमद इनामदार, वसिमखान पठाण, भानुदास खेडकर, योगेश चव्हाण, सुरज वाबळे, सुधीर खाडे, सुमित गवळी, सतिष त्रिभुवन, बाळासाहेब भापसे, सुजय हिवाळे, सतिष भवर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.