पुणे(प्रतिनिधि)
विश्रांतवाडी परिसरातून दुचाकी चोरून पसार झालेल्या चोरट्यांना पोलिसांनी जामखेड (अहिल्यानगर) येथून अटक केली आहे. या चोरट्यांकडून तीन चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, त्यात एक बुलेट दुचाकीचा समावेश आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अशी आहेत. आतिक बाबा शेख (वय २२, रा. कवडगाव, जामखेड), चांद नूरमहंमद शेख (वय २०, रा. पिंपरखेड, जामखेड) आणि चेतन ज्ञानेश्वर साळवे (वय १९, रा. कळस माळवाडी, विश्रांतवाडी, पुणे). विश्रांतवाडी परिसरातून आतिक शेख व चेतन साळवे यांनी दुचाकी चोरून त्या जामखेडला नेल्या होत्या. या चोरीप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चोरटे स्पष्टपणे दिसून आले.
पोलिस कर्मचारी विशाल गाडे व प्रमोद जाधव यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे विश्रांतवाडी पोलिसांचे पथक जामखेड येथे रवाना झाले. तेथे त्यांनी अतिक शेख व चेतन साळवे यांना अटक केली. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या. ही कारवाई पोलीस उपायुक्त हिंमत जाधव व सहायक आयुक्त विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव, गुन्हे शाखेचे निरीक्षक मंगेश हांडे, उपनिरीक्षक महेश भोसले, विशाल माने, बबन वणवे, यशवंत किर्वे, कृष्णा माचरे, अमजद शेख, वामन सावंत आणि संजय बादरे यांनी सहभाग घेतला.