नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पाकिस्तानकडून दहशतवाद पुरस्कृत केला जाते, असा आरोप भारतासह अनेक देशांनी आजवर केलेला आहे. पाकिस्तानने मात्र कधीही ही बाब स्वीकारली नव्हती. मात्र २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी स्काय न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये पाकिस्तानने अमेरिका आणि पाश्चात्या देशांच्या सांगण्यावरून दहशतवादाला खतपाणी घातल्याचे मान्य केले होते. त्यानंतर आता पाकिस्तानी नेता बिलावल भुट्टोनेही ही बाब मान्य केली आहे. पाकिस्तानचा इतिहास आहे, पाकिस्तानात वाढणाऱ्या दहशतवाद्यांनीच माझ्या आईची हत्या केली. मी स्वत: दहशतवादाचा पीडित आहे असे बिलावल भुट्टोने म्हटले आहे.
बिलावल भुट्टो यांनीही एका वृत्तवाहिनीला नुकतीच मुलाखत दिली. यावेळी त्यांच्यासमोरही ख्वाजा आसिफ यांना विचारलेला प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावर उत्तर देताना भुट्टो म्हणाले की, हे काही आता गुपित राहिलेले नाही. पाकिस्तानने भूतकाळात दहशतवादी गटांना मदत पुरविली होती. कट्टरपंथी भूमिकेतून आम्ही धडा घेतला आहे. त्यातून अंतर्गत सुधारणाही केली आहे. आता हा सगळा इतिहास आहे. आम्ही आता दहशतवादात सहभागी नाही. देशाने खूप काही भोगले आहे असे त्यांनी म्हटले.
भुट्टो पुढे म्हणाले, “पहिल्या अफगाण युद्धादरम्यान पाकिस्तानने मुजाहिदीनला पाठिंबा देऊन त्यांना निधी पुरवठा केला होता. पाकिस्तानचा यात सक्रिय सहभाग होता. पाश्चात्या देशांसह एकत्र येऊन आणि त्यांच्या साथीने आम्ही हे काम केले. पाकिस्तानात दहशतवादाच्या अनेक लाटा येत राहिल्या. यात आमचेही नुकसान झाले.”
पाकिस्तानने भूतकाळात दहशतवादाला पोसले असले तरी आता मात्र परिस्थिती बदलली आहे, असा दावाही भुट्टो यांनी केला. “आज आम्ही दहशतवादाच्या कोणत्याही कृत्यात सामील नाहीत. इतिहासात नक्कीच दुर्दैवाने आम्ही याचा भाग होतो. पण यातून आम्ही काही धडेही शिकलो”, असे भुट्टो यांनी या मुलाखतीत सांगितले.
काय म्हणाले होते ख्वाजा असिफ
पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी टीव्ही चॅनेलवरील मुलाखतीत आम्ही ३ दशकांपर्यंत अमेरिका आणि पाश्चात्य देशांसाठी डर्टी वर्क केले असे विधान केले होते. ही आमची चूक होती, त्याची शिक्षा आम्ही भोगतोय असेही ख्वाजा आसिफ यांनी कबुली दिली होती. २२ एप्रिलला पहलगाम दहशतवादी हल्ला झाला. त्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. हा हल्ला लश्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांनी घडवून आणला. या दहशतवादी संघटनेला पाकिस्तानात आश्रय दिला जात आहे असा आरोप होतो.ॉ
गुरुवारी मीरपुरखास येथे एका रॅलीला संबोधित करताना बिलावल भुट्टो म्हणाले की, “पाकिस्तानला शांतता हवी आहे. पण भारताने चिथावणी दिली, तर युद्धासाठी आम्ही तयार आहोत. आम्हाला युद्ध नकोय. पण कोणी सिंधुवर हल्ला केला, तर त्याला सडेतोड प्रत्युत्तर देऊ” पाकिस्तानी नेत्यांच्या या वक्तव्यावरुन त्यांचा दुटप्पीपणा दिसून आलाय.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा