अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या पथकाने सावेडी उपनगरातील यशोदानगर बाजार तळ, पाईपलाईन रस्ता येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या बिंगो नावाच्या जुगारावर छापा टाकून कारवाई केली. दोन जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 28 हजार 870 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सोमवारी (19 मे) सायंकाळी सातच्या सुमारास ही कारवाई केली.
पोलीस अंमलदार महेश मगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिंगो जुगाराचा मालक राहुल नंदु इंगळे (वय 34, रा. पद्मानगर, सावेडी) व बिंगो खेळणारा किरण एकनाथ शिंदोरे (वय 34, रा. पद्मानगर, सावेडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यशोदानगर बाजार तळ, पाईपलाईन रस्ता येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये बिंगो नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती उपअधीक्षक भारती यांना मिळाली होती. त्यांनी उपनिरीक्षक दत्तात्रय शिंदे, अंमलदार हेमंत खंडागळे, सागर व्दारके व मगर यांच्या पथकाला कारवाईच्या सुचना केल्या.
पथकाने पंचासमक्ष सदर ठिकाणी छापा टाकला असता राहुल नंदु इंगळे हा बिंगो जुगार चालवत असल्याचे व किरण एकनाथ शिदोरे हा खेळात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम, एलईडी स्क्रिन व रिमोट, माऊस व किबोर्ड असा 28 हजार 870 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तोफखाना पोलीस अधिक तपास करीत आहेत.