Monday, June 24, 2024
Homeनगरनगर तालुका पोलीस ठाण्याच्या ‘प्रभारी’वर कारवाई होणार

नगर तालुका पोलीस ठाण्याच्या ‘प्रभारी’वर कारवाई होणार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

नाशिक येथील विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाने कामरगाव (ता. नगर) शिवारात शनिवारी (दि. 26) छापा टाकून बायोडिझेल सदृश ज्वालाग्रही द्रव्याचा साठा पकडला होता. दरम्यान, नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या या उद्योगामुळे प्रभारी अधिकार्‍यांवर कारवाई होणार आहे. प्रभारी अधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस पाठवून खुलासा मागितला जाईल व पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांनी दिली.

विशेष पोलीस महानिरीक्षक शेखर पाटील यांच्या पथकाने नगर- पुणे महामार्गावरील कामरगाव शिवारात कारवाई करून बायोडिझेल सदृश द्रव्याचा साठा, विक्री करण्यासाठीचे साहित्य व वाहने असा सुमारे 29 लाख 34 हजार 910 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये चार लाख 75 हजार 410 रुपये किंमतीचे सहा हजार 95 लिटर बायोडिझेल सदृश इंधन मिळून आले होते. याप्रकरणी पाच जणांविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीही नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील साकत, कामरगाव येथे बायोडिझेल सदृश द्रव्याचा साठा पकडला होता.

महामार्गालगत सुरू असलेल्या या उद्योगाला नगर तालुका पोलिसांचे पाठबळ मिळत आहे. यामध्ये ‘अर्थपूर्ण’ संबंध दडले असल्याचे लपून राहिलेले नाही. दरम्यान, विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाला माहिती मिळताच त्यांनी सदर ठिकाणी कारवाई केली. या कारवाईमुळे तालुका पोलिसांचे धाबे दणाणले आहेत. ज्या हद्दीत अवैध धंद्यावर विशेष पोलीस महानिरीक्षकांचे पथक कारवाई करते त्या ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍यांना याबाबत जाब विचारला जातो. संबंधितांवर वरिष्ठांकडून कारवाई केली जाते. तशीच कारवाई नगर तालुका पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यावर होणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

आयजी पथकाची ‘चमकोगिरी’

विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे पथक कधीतरी नगर जिल्ह्यात एखादी कारवाई करून ‘चमकोगिरी’ करते. त्यांच्या पथकाला कारवाई करण्याचा अधिकार आहे. मात्र ज्या पोलीस ठाणे हद्दीत कारवाई केली जाते त्या संबंधित पोलीस ठाणे प्रभारी अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची हिम्मत विशेष पोलीस महानिरीक्षक दाखवत नाही. नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला असताना विशेष पोलीस महानिरीक्षक तालुका पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍यांवर काय कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या