Tuesday, December 10, 2024
Homeब्रेकिंग न्यूजLegislative Council Election 2024 : भाजपकडून तीन उमेदवारांची घोषणा

Legislative Council Election 2024 : भाजपकडून तीन उमेदवारांची घोषणा

कोकण पदवीधरमध्ये महायुतीत तिरंगी लढतीची शक्यता

मुंबई | Mumbai

देशासह राज्यातील लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) प्रक्रिया पार पडल्यानंतर आता राजकीय पक्षांसह सर्वांचे लक्ष ४ जून रोजी जाहीर होणाऱ्या निकालाकडे लागले आहे. मात्र, या निकालाच्या धामधुमीत निवडणूक आयोगाकडून काही दिवसांपूर्वी विविध राज्यांतील विधानपरिषदेची निवडणूक (Legislative Council Election) घोषित करण्यात आली होती. यात महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधरच्या जागांचा समावेश असून यासाठी राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

- Advertisement -

यामध्ये महायुतीमधील (Mahayuti) घटक पक्ष असणाऱ्या मनसेने (MNS)कोकण पदवीधर मतदारसंघातून घटक पक्षांशी चर्चा न करता अभिनेते अभिजीत पानसे यांना उमेदवारी दिली आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने (NCP) मुंबई शिक्षक मतदारसंघातून शिवाजीराव नलावडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यानंतर आता भाजपनेही शिक्षक आणि पदवीधरसाठी आपले तीन अधिकृत उमेदवार जाहीर केले आहेत. तर शिंदेंच्या शिवसेनेकडून (Shinde Shivsena) सचिव संजय मोरे यांनी कोकण पदवीधर मतदारसंघासाठी कोकण भवन येथून उमेदवारी अर्ज घेतला आहे.

भाजपकडून (BJP) मुंबई शिक्षक व पदवीधरसह, कोकण पदवीधरसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये कोकण पदवीधरसाठी विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर मुंबई शिक्षकमधून शिवनाथ दराडे आणि मुंबई पदवीधरतून किरण शेलार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यात कोकणात शिंदेंच्या शिवसेनेसह भाजप आणि मनसेने उमेदवारी दिल्यामुळे तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

तसेच महाविकास आघाडीतील (Mahavikas Aaghadi) कॉंग्रेसकडून कोकण पदवीधरमधून रमेश कीर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुंबई पदवीधरसाठी अनिल परब आणि मुंबई शिक्षक मतदारसंघातून ज.मो.अभ्यंकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हे दोन्ही उमेदवार आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. याशिवाय नशिक शिक्षक मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेकडून संदीप गुळवे यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आता महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये होणाऱ्या लढतीत कोण बाजी मारतो? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या