मुंबई | Mumbai
भारतीय जनता पक्षाकडून (BJP) राज्यातील विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारांची (Candidate) घोषणा करण्यात आली आहे. विधानपरिषदेच्या पुणे शिक्षक आणि पदवीधर तर नागपूर पदवीधर या मतदारसंघांसाठी तीन उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. यात भाजपने धक्कातंत्राचा वापर केल्याचे दिसून आले आहे. (Maharashtra Legislative Council Elections)
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने आज (रविवार) पुणे पदवीधरसाठी स्मिता जाधव आणि पुणे शिक्षक मतदारसंघासाठी कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी घोषित केली आहे. तर नागपूर पदवीधरतून सुधाकर कोहळे यांना संधी देण्यात आली आहे. महायुतीकडून (Mahayuti) पुणे शिक्षक मतदारसंघातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांनी देखील तयारी केली असून, त्यांनीही उमेदवारी मागणी केली आहे. परंतु, आता पुणे शिक्षक मतदारसंघाची जागा महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला गेल्याने चिवटे थांबण्याचा निर्णय घेतात की बंडखोरी करतात? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
दरम्यान, याआधी काँग्रेसकडून (Congress) आपल्या तीन उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये नागपूर पदवीधर मतदारसंघातून अभिजित वंजारी यांना संधी देण्यात आली आहे. तर पुणे शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगावकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. याशिवाय अमरावती शिक्षक मतदारसंघातून आदिती पोहरे यांना काँग्रेसकडून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. या उमेद्वारींमुळे काही ठिकाणचे निवडणुकींच्या लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे.
निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक
अधिसूचना जारी – २९ सप्टेंबर २०२६
उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख – ०६ ऑक्टोबर २०२६
अर्जांची छाननी – ०७ ऑक्टोबर २०२६
अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख – ०९ ऑक्टोबर २०२६
मतदानाची तारीख व वेळ – २३ ऑक्टोबर २०२६ (सकाळी ८ ते दुपारी ४ )
मतमोजणी व निकाल – २७ ऑक्टोबर २०२६




