दिल्ली । Delhi
आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक आणि २०२९ च्या आगामी लोकसभा निवडणुकांची मोर्चेबांधणी लक्षात घेता, भारतीय जनता पक्षाने (BJP) आपल्या पक्षसंघटनेत अमूलाग्र व धोरणात्मक बदल करत संपूर्ण देशात राजकीय खळबळ उडवून दिली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर राष्ट्रीय पातळीवर पक्षसंघटना अधिक मजबूत आणि आक्रमक करण्याच्या उद्देशाने बुधवारी ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी नवीन प्रभारी आणि सहप्रभारींची अधिकृत यादी जाहीर केली आहे. या नव्या रचनेमध्ये देशातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे स्थान असणाऱ्या महाराष्ट्रातील चार बड्या नेत्यांवर राष्ट्रीय स्तरावरील मोठी जबाबदारी सोपवण्यात आली असून, पक्षाने मराठी नेतृत्वावरील आपला विश्वास पुनरुच्चारित केला आहे.
नवी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयातून जाहीर झालेल्या या नव्या यादीनुसार, महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडे देशातील सर्वांत मोठे आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेश राज्याच्या प्रभारीपदाची महत्त्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, बुद्धिवादी आणि अभ्यासू नेते डॉ. विनय सहस्रबुद्धे यांची दिल्ली भाजपच्या प्रभारीपदी वर्णी लागली आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्याकडे शेजारील गोवा राज्याची जबाबदारी सोपवण्यात आली असून, पुण्याच्या राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांच्यावर उत्तर प्रदेशच्या सहप्रभारीपदाची जबाबदारी देऊन त्यांच्या राजकीय वजनात मोठी वाढ करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या दृष्टीनेही केंद्रीय नेतृत्वाने मोठा बदल केला आहे. महाराष्ट्रातील आगामी राजकीय आव्हाने आणि संघटन मजबूत करण्यासाठी राज्यसभेचे खासदार बैजयंत जय पांडा यांची महाराष्ट्र भाजपचे नवीन प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या मदतीसाठी पक्षाने तगडी टीम तयार केली असून अमित मालवीय, सदानंद शेट तानावडे आणि कमलजीत सहरावत यांची सहप्रभारी म्हणून नेमणूक केली आहे. महाराष्ट्रात सत्ता टिकवून ठेवणे आणि पक्षसंघटन तळागाळापर्यंत पोहचवणे ही या नव्या टीमसमोरील प्राथमिक जबाबदारी असणार आहे.
पक्षाध्यक्ष नितीन नवीन यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून भाजपमध्ये व्यापक संघटनात्मक बदल सुरू आहेत. उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुका आणि २०२९ ची लोकसभा निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने रणनीती आखूनच या नव्या मोहरऱ्यांची निवड करण्यात आली आहे. यात स्मृती इराणी यांच्याकडे छत्तीसगढ आणि हरियाणाची जबाबदारी देण्यात आली आहे, तर अनुभवी नेते राम माधव यांच्याकडे उत्तराखंड आणि तमिळनाडू सोपवण्यात आले आहे. तसेच तरुण चुघ यांना गुजरातचे, तर हरीश द्विवेदी यांना कर्नाटक आणि बिहारचे प्रभारी बनवण्यात आले आहे.
भाजपची राज्यनिहाय प्रभारी आणि सहप्रभारींची संपूर्ण यादी
- अंदमान आणि निकोबार: प्रभारी – श्री जय प्रकाश (दिल्ली)
- अरुणाचल प्रदेश: प्रभारी – डॉ. देवेश कुमार (बिहार)
- आंध्र प्रदेश: प्रभारी – डॉ. अरविंद भदौरिया | सहप्रभारी – श्रीमती वनथी श्रीनिवासन
- असम: प्रभारी – श्री मंगल पांडे | सहप्रभारी – श्रीमती फांग्नोन कोन्याक, श्री मनोज टिंग्गा
- बिहार: प्रभारी – श्री हरीश द्विवेदी | सहप्रभारी – श्रीमती संगीता यादव, श्री रोहन गुप्ता
- चंदीगड: प्रभारी – श्री महेंद्र पांडे
- छत्तीसगढ: प्रभारी – श्रीमती स्मृती इराणी | सहप्रभारी – श्री सिद्धार्थ शम्भू
- दादरा नगर हवेली आणि दमण-दीव: प्रभारी – श्रीमती वर्षाबेन नरेंद्रभाई दोशी
- दिल्ली: प्रभारी – डॉ. विनय सहस्रबुद्धे | सहप्रभारी – श्री जामयांग त्सेरिंग नामग्याल, श्रीमती दर्शानाबेन जरदोश
- गोवा: प्रभारी – डॉ. भारती प्रवीन पवार | सहप्रभारी – श्री अनिल एंटनी
- गुजरात: प्रभारी – श्री तरुण चुघ | सहप्रभारी – श्री अजय महावर, श्रीमती गोमती साई
- हरियाणा: प्रभारी – श्रीमती स्मृती इराणी | सहप्रभारी – डॉ. भोला सिंह
- हिमाचल प्रदेश: प्रभारी – श्री श्रीकांत शर्मा | सहप्रभारी – श्रीमती दर्शना सिंह
- जम्मू आणि काश्मीर: प्रभारी – डॉ. सतीश पूनिया | सहप्रभारी – श्रीमती रीना कश्यप (हिमाचल प्रदेश)
- झारखंड: प्रभारी – श्री गजेंद्र पटेल | सहप्रभारी – श्री सौरभ सिंह, श्रीमती निवेदिता सिंह (बिहार)
- कर्नाटक: प्रभारी – श्री हरीश द्विवेदी | सहप्रभारी – डॉ. के. वेंकटेश्वरलू
- केरळ: प्रभारी – प्रो. एम. नागराजा | सहप्रभारी – श्री एम. वेंकटेशन
- लडाख: प्रभारी – श्री राजकुमार भाटिया (दिल्ली)
- लक्षद्वीप: प्रभारी – श्री जॉर्ज कुरियन
- मध्य प्रदेश: प्रभारी – श्री बबलू कुमार देव | सहप्रभारी – श्रीमती रेखा वर्मा
- महाराष्ट्र: प्रभारी – श्री बैजयंत जय पांडा | सहप्रभारी – श्री अमित मालवीय, श्री सदानंद शेट तानावडे, श्रीमती कमलजीत सहरावत
- मणिपूर: प्रभारी – डॉ. राजदीप रॉय
- मेघालय: प्रभारी – श्री कनाद पुरकायस्थ | सहप्रभारी – डॉ. नुमल मोसमन (असम)
- मिझोरम: प्रभारी – डॉ. भगवत कराड
- नागालँड: प्रभारी – श्री अनिल एंटनी
- ओडिशा: प्रभारी – श्रीमती डी. पुरंदेश्वरी | सहप्रभारी – डॉ. स्वदेश सिंह
- पुडुचेरी: प्रभारी – श्री के. सुरेंद्रन
- पंजाब: प्रभारी – डॉ. सतीश पूनिया | सहप्रभारी – श्री वीरेंद्र सचदेवा, श्रीमती (डॉ.) अलका गुर्जर
- राजस्थान: प्रभारी – श्री संजय भाटिया | सहप्रभारी – श्रीमती कविता पाटीदार, श्री कुलजीत चहल
- सिक्कीम: प्रभारी – श्री राजू बिस्ता
- तमिळनाडू: प्रभारी – श्री राम माधव | सहप्रभारी – श्री निर्मल कुमार सुराणा, श्रीमती डी. के. अरुणा
- तेलंगणा: प्रभारी – श्री सुनील बंसल | सहप्रभारी – श्री अभय पाटिल, श्रीमती रेखा शर्मा
- त्रिपुरा: प्रभारी – श्री मृगांका देव बर्मन
- उत्तर प्रदेश: प्रभारी – श्री विनोद तावडे | सहप्रभारी – श्री जगदीश पटेल, श्रीमती मेधा कुलकर्णी, डॉ. प्रदीप शर्मा, श्री अनंत ओझा
- उत्तराखंड: प्रभारी – श्री राम माधव | सहप्रभारी – श्री अरविंद मेनन, सुश्री बांसुरी स्वराज
- पश्चिम बंगाल: प्रभारी – श्री सुनील बंसल | सहप्रभारी – श्री लाल सिंह आर्य, श्री राजेंद्र सिंह (बिहार), श्रीमती पिंकी कुशवाहा (बिहार)
एकंदरीत, भाजपने अत्यंत चाणाक्षपणे राज्यनिहाय प्रभारींची निवड करून येणाऱ्या निवडणुकांमध्ये विजयाची हॅटट्रिक मारण्यासाठी मोर्चेबांधणी पूर्ण केली आहे. महाराष्ट्रातील विनोद तावडे, डॉ. मेधा कुलकर्णी, डॉ. विनय सहस्रबुद्धे आणि डॉ. भारती पवार यांच्यावर टाकलेला विश्वास हा केवळ राज्यातील भाजप समर्थकांचा उत्साह वाढवणारा नाही, तर राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे राजकीय वजन अधिक मजबूत करणारा ठरला आहे.




