Friday, September 11, 2026
Homeराजकीय2027 च्या विधानसभा निवडणुकीआधी भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'! विनोद तावडेंची भाजपच्या यूपी प्रभारीपदी नियुक्ती

2027 च्या विधानसभा निवडणुकीआधी भाजपचा ‘मास्टरस्ट्रोक’! विनोद तावडेंची भाजपच्या यूपी प्रभारीपदी नियुक्ती

दिल्ली । Delhi

भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करत आगामी निवडणुकांच्या दृष्टीने मोठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. पक्षाच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा झाल्यानंतर लगेचच राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडे उत्तर प्रदेशच्या राज्य प्रभारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. देशातील सर्वाधिक लोकसंख्या आणि सर्वाधिक लोकसभा जागा असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये २०२७ मध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्याने ही नियुक्ती राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

- Advertisement -

भाजपने केवळ उत्तर प्रदेशच नव्हे, तर इतर राज्यांसाठीही संघटनात्मक जबाबदाऱ्यांचे वाटप केले आहे. त्यानुसार तरुण चुग यांच्याकडे गुजरात, तर सतीश पुनिया यांच्याकडे पंजाबच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आगामी निवडणुका लक्षात घेऊन अनुभवी नेतृत्वावर पक्षाने विश्वास दाखविल्याचे या नियुक्त्यांमधून स्पष्ट होत आहे.

विनोद तावडे यांनी गेल्या काही वर्षांत पक्षाच्या विविध राष्ट्रीय मोहिमा आणि निवडणुकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. २०२२ मधील राष्ट्रपती निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या निवडणूक प्रभारी म्हणून त्यांनी विविध राज्यांतील समन्वयाची जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर २०२५ च्या उपराष्ट्रपती निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रचार आणि मित्रपक्षांशी समन्वयाची जबाबदारीही त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

संघटनात्मक पातळीवरही तावडे यांची कामगिरी उल्लेखनीय मानली जाते. २०२० मध्ये हरियाणाचे प्रभारी म्हणून त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला. त्यानंतर बिहारची जबाबदारी स्वीकारल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींमध्ये रणनीतीकार म्हणून त्यांनी भूमिका बजावली. बिहारमधील एनडीएच्या निवडणूक तयारीपासून ते संघटन विस्तारापर्यंत विविध स्तरांवर त्यांनी काम केले असल्याचे पक्षाकडून सांगितले जाते.

‘संघटन पर्व २०२४’ अंतर्गत राबविण्यात आलेल्या सदस्यता अभियानाचे राष्ट्रीय प्रभारी म्हणून त्यांनी नेतृत्व केले. या मोहिमेदरम्यान अल्पावधीत देशभरात मोठ्या प्रमाणावर सदस्य नोंदणी झाल्याचा दावा भाजपने केला होता. तसेच उत्तर प्रदेशातील संघटनात्मक निवडणुका, लोकसभा निवडणुकीतील स्टार प्रचारकांच्या दौऱ्यांचे नियोजन, विविध राज्यांतील विधानसभा निवडणुकांची रणनीती आणि मुख्यमंत्री निवडीसाठी निरीक्षक म्हणूनही त्यांनी जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.

याशिवाय ‘मन की बात’, ‘हर घर तिरंगा’, ‘मेरी माटी मेरा देश’ आणि चांद्रयान मोहिमेसंदर्भातील जनजागृती कार्यक्रमांचे राष्ट्रीय समन्वयक म्हणूनही त्यांनी काम केले. युक्रेनमधील युद्धादरम्यान ‘ऑपरेशन गंगा’ मोहिमेत भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित परतीसाठी समन्वय साधण्याचे कार्यही त्यांनी केले होते. केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीवर देखरेख करण्यामध्येही त्यांचा सहभाग राहिला आहे.

सध्या विनोद तावडे हे महाराष्ट्रातून राज्यसभेचे सदस्य असून संसदेच्या वित्तविषयक स्थायी समिती तसेच परराष्ट्र मंत्रालयाच्या सल्लागार समितीवर कार्यरत आहेत. उत्तर प्रदेशसारख्या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या राज्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवल्याने आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या संघटनात्मक रणनीतीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

मनोज जरांगेंच्या अडचणी वाढणार

0
मुंबई | Mumbai मराठा आरक्षण अभ्यासक अजय बारस्कर मनोज जरांगेंविरुद्ध चांगलेच आक्रमक झाले आहेत. आता अजय बारस्कर यांनी थेट ईडीमध्ये जरांगेंविरुद्ध तक्रार केली असल्याची माहिती...