मुंबई । Mumbai
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त ‘आवाज कुणाचा’ या पॉडकास्ट मुलाखत दिली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ही मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. यावर आता भाजपने तिखट प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट केले आहे. “हिंदुत्ववादी विचारांची ज्वलंत मशाल मिठी नदीत विझवून सोनिया गांधींच्या सेनेसमोर मुजरा करणारे उद्धव ठाकरे आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करत आहेत” असं म्हणत त्यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. “मी, माझा पेपर, स्वकियांशी माझा झालेला सामना, मीच संपादक, माझाच मुलाखतकार, माझीच मुलाखत… भन्नाट!” असा टोला देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना लावला आहे. “घराणेशाही टिकवण्यासाठी एकत्र आलेल्या ‘इस्ट इंडिया‘ कंपनीचं कडबोळं आता लोकशाही टिकवण्याच्या गप्पा मारत आहेत. मी, माझं कुटुंब आणि माझा मुलगा एवढाच विचार करणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या तोंडून लोकशाही वाचवण्याच्या गप्पा ऐकणं म्हणजे मोठा विनोदच आहे” असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.
Uddhav Thackeray Interview : मुलाखतीतून उद्धव ठाकरेंचा शिंदे गट, भाजपवर हल्लाबोल तर अजित पवारांवर स्तुतीसुमनं… वाचा संपूर्ण मुलाखत जशीच्या तशी!
उद्धव ठाकरेंनी काय म्हटलं होतं मुलाखतीत?
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची एक मुलाखत प्रसारित करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे खासदार आणि शिवसेनेच्या मुखपत्राचे संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीच्या पहिल्या भागात उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रासह देशातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, गेल्या आठवड्यात बऱ्याच वर्षांनंतर या देशात ‘एनडीए’ नावाचा काहीतरी अमिबा जिवंत आहे हे पाहायला मिळालं. एनडीएच्या बैठकीबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, गेल्या आठवड्यात बऱ्याच वर्षांनंतर या देशात ‘एनडीए’ नावाचा काहीतरी अमिबा जिवंत आहे हे कळलं. आपण जे देशभक्त राजकारणी आहोत त्यांची ‘इंडिया’ (INDIA) नावाची एक आघाडी झाली आहे, या आघाडीला उत्तर देण्यासाठी त्याच दिवशी (विरोधकांच्या बैठकीच्या दिवशी) आपल्या माननीय पंतप्रधानांनी एकदम आपल्या आठवणीतल्या गोष्टी बाहेर काढल्या, ठेवणीतल्या गोष्टी बाहेर काढल्या आणि ३६ पक्षांची जेवणावळ त्यांनी घातली.