नवी दिल्ली | New Delhi –
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत अनेक आरोप केले आहेत. यावर देवेंद्र फडणवीसांनी आज प्रत्युत्तर दिले आहे. मी घरची धुनी रस्त्यावर
धुवत नाही. एकनाथ खडसे हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यावर मी कोणतीही टीका टिप्पणी करणार नाही, अशा शब्दात त्यांनी पलटवार केला आहे. शुक्रवारी दिल्लीत माध्यमांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी खडसेंनी उघडपणे केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले.
आमचे मुख्यमंत्री हे ड्राय क्लिनर होते मला सोडून त्यांनी सर्वांना क्लीन चिट दिली असा टोला भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला होता. फडणवीस हे दिल्लीच्या दौर्यावर असून, त्यांनी खडसे यांनी केलेल्या टीकेवर स्पष्टीकरण दिले.
ते म्हणाले, एकनाथ खडसे यांना आपला राजीनामा मनीष भंगाळे प्रकरणात नव्हे तर एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणात द्यावा लागला. मनीष भंगाळे प्रकरणात खडसेंना क्लीन चिट मिळाली आहे. त्यांच्यावर उच्च न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला, माझ्यामुळे नाही. त्यामुळे खडसेंनी विनाकारण गैरसमज पसरवू नये. त्यावर एकत्र बसून चर्चा करू व ज्येष्ठ नेत्यांच्या तक्रारी मिटवू.
एकनाथ खडसे यांची देवेंद्र फडणवीसांवर असलेली नाराजी काही नवखी नाही. गुरुवारी झालेल्या जनसेवेचा मानबिंदू या पुस्तक प्रकाशनावेळी खडसेंनी पुन्हा फडणवीसांवर तोफ डागली. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मला फार त्रास झाला. माझ्याविरोधात षडयंत्र रचले गेले, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. तसेच याबाबत मी पुरावे जमा केले असून वरिष्ठांना जाब विचारणारा असल्याचा सूचक इशारा त्यांनी यावेळी दिला.