मुंबई वार्तापत्र | उद्धव ढगे-पाटील Mumbai
मिनी विधानसभा निवडणूक म्हणून ओळखल्या गेलेल्या राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला जनादेश मिळाला आहे. २९ पैकी २५ महापालिकांवर भाजप-महायुतीने झेंडा फडकवला आहे. या निवडणुकीत भाजपचे विक्रमी संख्येने नगरसेवक निवडून आले आहेत.
मुख्यमंत्रिपदावर असताना फडणवीस यांनी २०१७ च्या महापालिका निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळवून दिला होता. आज नऊ वर्षानंतर फडणवीस यांनी भाजपच्या विजयाची पुनरावृत्ती करीत राज्याच्या राजकारणातील आपला करिश्मा दाखवून दिला. यापुढे राज्याचे राजकारण भाजपकेंद्रित असेल असे या निवडणूक निकालाने अधोरेखित केले आहे. उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंनी मुंबई, ठाणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर अशा मोजक्याच महापालिकांमध्ये आपले लक्ष केंद्रित केले होते. दोन दशकानंतर एकत्र येऊनही ठाकरे बंधूंना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. दोघांनी मुंबईत भाजप-शिवसेना शिंदे गटाला चांगलीच झुंज दिली. मात्र, मुंबई महापालिकेतील अपेक्षित यश त्यांना मिळू शकले नाही. भाजपच्या झंझावातासमोर विरोधी पक्षातील काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गटाला लातूर, कोल्हापूर, परभणी, चंद्रपूर वगळता अन्यत्र यश मिळू शकले नाही.
तयारीचे मिळाले फळ
विधानसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर भाजप महायुतीचे पुढचे लक्ष्य हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था होत्या. आधी नगरपालिका निवडणूक जिंकल्यानंतर भाजपने महापालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली. त्यासाठी प्रत्येक महापालिकेची जबाबदारी नेत्यांवर सोपवली होती. निवडणूक संपेपर्यंत महापालिका क्षेत्र सोडायचे नाही, असे आदेश नेत्यांना, मंत्र्यांना देण्यात आले होते. याशिवाय, प्रत्येक महापालिका निवडणुकीत वेगवेगेळा मुद्दा चर्चेत आणून विरोधी पक्षाला आपल्या मुद्द्यांवर प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले. उमेदवार निवडीत काटेकोर निकष लावत भाजपने आपले उमेदवार निवडले. अन्य पक्षातील नेत्यांना पक्षात घेऊन भाजपने त्यांना तिकीट दिले. त्यासाठी विरोधी पक्षाची टीका सहन केली आणि कार्यकर्त्यांची नाराजीही पत्करली. पक्षातील बंडखोरी नियंत्रणात ठेवून भाजपने निवडणूक व्यूहरचना आखली. या निवडणुकीत भाजपचा चेहरा देवेंद्र फडणवीस हेच होते. फडणवीस यांनीही महत्वाच्या महापालिकांमध्ये प्रचार सभा घेतल्या. रोड शो, पदयात्रा, प्रकट मुलाखती या माध्यमातून फडणवीस यांनी भाजपचा विकासाचा अजेंडा मतदारांपर्यंत पोहचवला. मतदारांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. २०१७ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत ८२ जागा जिंकणार्या भाजपने सत्तेला गवसणी घालण्याची तयारी केली होती. मात्र, तेव्हा एकत्र असलेल्या शिवसेनेच्या आग्रहामुळे फडणवीस यांनी माघार घेतली होती. आता भाजपने शिवसेना शिंदेंच्या मदतीने मुंबई महापालिका जिंकण्याचे स्वप्न जवळपास पूर्णत्वास आणले आहे.
शिंदेंनी ताकद दाखवली
मुंबई, ठाण्यात भाजपशी युती करण्याचे राजकीय शहाणपण दाखवून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली राजकीय ताकद दाखवून दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे मुंबई महापालिका जाऊ नये, असा शिंदे यांचा प्रयत्न होता. त्यासाठी मुंबईतील जागावाटपात शिंदेंनी फारशी खळखळ केली नाही. भाजपसोबतच्या युतीचा फायदा शिंदे यांना मुंबई, ठाण्यात झाला. मुंबईत शिंदे गटाचे जवळपास २५ ते ३० उमेदवार निवडून आले आहेत. ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतरही शिंदे यांनी मिळवलेले यश उल्लेखनीय आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली हा आपला बालेकिल्ला असल्याचे शिंदे यांनी आजच्या निकालातून सिद्ध केले आहे. मात्र, शिंदेंना नवी मुंबई जिंकता आली नाही. नवी मुंबईत एकनाथ शिंदे यांनी भाजपचे नेते गणेश नाईक यांना आव्हान दिले होते. या लढाईत नाईक यांनी शिंदे यांच्यावर मात केली. नवी मुंबई वगळता शिंदेंनी अन्यत्र मिळवलेल्या यशामुळे भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील स्थान अबाधित राहणार आहे. भाजपला शिंदेच्या राजकीय ताकदीकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
ठाकरे बंधूंचे अपयश
विधानसभा निवडणुकीतील पराभवाने खचलेल्या उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेतील सत्ता कायम ठेवण्याचा चंग बांधला होता. त्यासाठी त्यांनी राज ठाकरे यांना सोबत घेतले. २० वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आल्याने मुंबईत मराठी माणूस एकवटला होता. त्यामुळे मुंबईच्या निवडणुकीत मराठी माणूस, मराठी अस्मिता, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असे मुद्दे चर्चेत आणूनही ठाकरे बंधूंना मुंबईत अपेक्षित यश मिळू शकले नाही. मात्र, ठाकरे यांनी मुंबई शहर तसेच दादर, लालबाग, प्रभादेवी, माहीम, वरळी या मराठीबहुल पट्टयात आपले वर्चस्व राखले. पश्चिम उपनगरात जोगेश्वरी, दिंडोशी आणि पूर्व उपनगरात भांडुप, विक्रोळी हा भाग वगळता ठाकरे बंधूंना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. २०१७ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत तेव्हा एकत्र असलेल्या शिवसेनेने स्वबळावर ८४ जागा जिंकल्या होत्या. आता राज ठाकरे सोबत असतानाही उद्धव ठाकरे यांना गेल्या निवडणुकीतील कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही. राज ठाकरे यांच्या इंजिनला मशालीच्या जोड मिळूनही त्यांचे उमेदवार दोन आकडी संख्येत निवडून येतील की नाही, ही शंका आहे.
काँग्रेस-वंचित प्रभावहीन
महापालिका निवडणुकीत काँग्रेसने मुंबई, लातूर आणि अन्य ठिकाणी वंचित बहुजन सोबत आघाडी केली होती. मुंबईत भाजप-शिवसेना शिंदे गट विरुद्ध ठाकरे बंधूंच्या लढाईत काँग्रेस-वंचित आघाडी प्रभावहीन ठरली आहे. ही आघाडी सुरुवातीपासून लढतीत नव्हती. शिवाय पक्षातील अंतर्गत मतभेदांमुळे मुंबई काँग्रेसच्या नेत्यांमध्ये कोणताही समन्वय नव्हता. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड या एकाकी लढताना दिसल्या. भाई जगताप, नसीम खान, चंद्रकांत हंडोरे आदी नेते प्रचारात फारसे सक्रिय दिसले नाहीत. तेलंगणाचे मंत्री महम्मद अझरुद्दीन, खासदार इम्रान प्रतापगढी वगळता काँग्रेसच्या अन्य राज्यातील नेत्यांनी मुंबईत प्रचाराला येण्याचे टाळले. याशिवाय काँग्रेसचे मुंबईतील संघटन कमजोर असल्याने त्याचा फटका काँग्रेसला बसला.
अजित पवार यांना धक्का
महापालिका निवडणुकीत भाजपने मित्र पक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्का दिला. अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये आपली राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली होती. मात्र, या दोन्ही ठिकाणी भाजपने सहजपणे अजित पवार यांच्यावर मात केली. भाजपचे आव्हान लक्षात घेऊन अजित पवार यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोबत घेतले होते. तरीही भाजपने त्यांची डाळ शिजू दिली नाही. अहिल्यानगर वगळता अन्य कुठेही राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळू शकले नाहीत. मुंबईत ९४ जागा लढणार्या राष्ट्रवादीला फक्त दोन जागांवर विजय मिळवता आला.
एमआयएमची मुसंडी
महापालिका निवडणुकीत छोट्या पक्षांचे पानिपत होत असताना एमआयएम पक्षाने मुंबईसह राज्यभरात जोरदार मुसंडी मारली आहे. मुंबईत एमआयएमचे सहा नगरसेवक निवडून आले आहेत. याशिवाय पक्षाने छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, नांदेड, धुळे या महापालिकेत चांगली कामगिरी केली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने काही महापालिकांमध्ये खाते उघडून चंचुप्रवेश केला आहे.




