Thursday, May 2, 2024
Homeराजकीयभाजपच्या कदम-मुंडे यांच्यातील वाद उफाळला !

भाजपच्या कदम-मुंडे यांच्यातील वाद उफाळला !

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

भाजप युवा मोर्चाचे उत्तरेतील जिल्हाध्यक्ष सत्यजित कदम यांनी पक्षाची दक्षिणेतील जिल्हा कार्यकारिणी जाहीर करताना

- Advertisement -

दक्षिणेचे जिल्हाध्यक्ष यांना विश्वासात न घेता परस्पर कार्यक्रम केला. पक्षाच्या प्रदेश कार्यालयाने ठरवून दिलेले नियम न पाळता स्वत:च्या अधिकारात चार सरचिटणीस यांची नेमणूक केली. जिल्हाध्यक्ष यांच्या अधिकारांवर गदा आणली.

यामुळे शुक्रवारी अवघ्या 24 तासांत भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अरूण मुंढे यांनी युवा मोर्चाचे कदम यांनी जाहीर केलेल्या कार्यकारिणीसह त्यांच्या अध्यक्षपदालाच स्थगिती दिली आहे. यामुळे पक्षातील संघटनात्मक वाद चांगलाच उफाळ्याचे दिसत आहे.

दोन दिवसांपूर्वी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सत्यजित कदम यांनी दक्षिणेतील युवा मोर्चाची कार्यकारिणी जाहीर केली होती. या कार्यकारिणीबाबत मला वृत्तपत्र आणि व्हॉट्सअ‍ॅपवर माहिती मिळाल्याचे भाजपचे दक्षिणेचे जिल्हाध्यक्ष मुंढे यांनी सांगत युवा मोर्चाच्या दक्षिणेच्या कार्यकारिणीला स्थगिती दिल्याचे सांगितले.

याबाबत अधिक माहिती देताना मुंढे म्हणाले, भाजपमध्ये पक्षाची कार्यकारिणी, अन्य आघाड्यांच्या सदस्य आणि पदाधिकारी निवडताना जिल्हाध्यक्ष यांच्याशी चर्चा करून त्यांना विश्वासात घेऊन नावे जाहीर करणे अभिप्रेत आहे. यासह प्रदेशने या निवडी करतांना नियम घालून दिलेले आहेत. त्यानुसार पक्षाच्या विविध आघाड्याच्या प्रमुखांनी जिल्हाध्यक्ष यांच्याशी चर्चा करून समंती घेणे आवश्यक आहे.

त्यानुसार काही दिवसांपूर्वी कदम यांनी दक्षिणेतील युवा मोर्चाच्या कार्यकारणीचे नावे माझ्याकडे पाठविली होती. त्यावर आपण एकत्र बसून चर्चा करून नावे अंतिम करून ती जाहीर करून असे मुंढे यांनी कदम यांना सांगितले होते. त्यावर कदम यांनी मी जिल्हाध्यक्ष असून मला अधिकार असल्याने मी युवा मोर्चाची कार्यकारिणी जाहीर करणार असल्याचे सांगितले होते. वास्तवात हा प्रकार पक्षात अभिप्रेत नाही.

यासह पक्षात चार-चार सरचिटणीस नेमण्याची पध्दत नाही. तसेच पक्षासाठी योगदान देणार्‍या व्यक्तीची संघटनात्मक पातळीवर निवड होते की नाही हे जिल्हाध्यक्ष या नात्याने पाहणे माझे कामच आहे. व्यक्तीगत प्रेमापोटी पक्षाच्या संघटनात्मक पातळीवर निवड करणे चुकीचे आणि पक्ष हिता विरूध्द असल्याचे सांगत त्यांनी कदम यांनी जाहीर केलेल्या युवा मोर्चाच्या कार्यकारिणीसह त्यांच्या जिल्हाध्यक्ष पदाला देखील स्थगिती दिल्याचे ‘सार्वमत’शी बोलतांना सांगितले.

उत्तरेचा दक्षिणेत हस्तक्षेप

मुुंढे हे दक्षिणेचे जिल्हाध्यक्ष आहेत. दक्षिणेतील पक्षाच्या आघाड्या आणि अन्य पदाधिकारी निवडतांना मला विश्वासत आणि विचारून घेणे आवश्यक आहे. मात्र, युवा मोर्चाच्या निवडीत दक्षिणेतील निवडी कदम यांनी परस्पर केल्या. यामुळे उत्तेरचा दक्षिणेत हस्तक्षेप वाढत असल्याचा पक्षातील काहींचा आरोप आहे. यातून मुंढे आणि कदम यांच्यात वाद निर्माण झाल्याचे पक्षाच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

वादाला अनेक किनार

मुंढे आणि कदम यांच्या वादाला अनेक किनार आहेत. कदम हे देवळाली प्रवरा येथील रहिवासी असून त्यांचे पक्षात चांगलेच वजन आहे. यातून राहुरीसह दक्षिणेतील काही नेत्यांचा कदम यांना विरोध असून विधानसभा निवडणुकीच्या वेळी राहुरीत निर्माण झालेल्या वादाची सल अद्याप काहींच्या डोक्यात आहेत. यामुळे आता जिल्ह्यातील भाजपमधील संघात्मक वाद कोणत्या थरापर्यंत पोहणार आणि त्यात कोण कोण उडी घेणार याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या