मुंबई | Mumbai –
राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी पंधरा टक्के बदल्यांच्या नावाखाली अनेक मलाईदार ठिकाणी मर्जीतील अधिकार्यांच्या बदल्या करून प्रचंड पैसे कमावले असल्याचा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तसेच याची सीआयडीकडून चौकशी करावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. Chandrakant Patil demand CID Inquiry on Officer transfers in Maharashtra
ते म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्थ खात्याने बदल्या करू नयेत, असा आदेश दिलेला असतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सामान्य प्रशासन विभागाने बदल्यांवरील स्थगिती उठवली, हे आश्चर्यकारक आहे. राज्य सरकारने करोनामुळे बदल्या रोखल्या होत्या पण नंतर पंधरा टक्के बदल्यांना परवानगी देऊन त्यावरील स्थगिती उठविली. परिणामी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी मलाईदार ठिकाणी बदली करून देण्याचा बाजार मांडला. यामध्ये फार मोठ्या रकमेची उलाढाल झाली. तसेच ज्यांचे राजकीय लागेबांधे नाहीत आणि ज्यांच्याकडे आर्थिक बळ नाही अशा अधिकारी व कर्मचार्यांवर यामध्ये अन्याय झाला आहे. या सर्व प्रकरणाची सीआयडीकडून चौकशी करण्याची गरज आहे.