मुंबई | Mumbai
भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते, माजी कॅबिनेट मंत्री आणि मुंबईतला प्रख्यात राजकीय व्यक्तिमत्त्व राज के. पुरोहित यांचे शनिवार रात्री मुंबईतल्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते सुमारे ७१ वर्षांचे होते गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे मुंबईतील भाजपचा एक आक्रमक आणि अभ्यासू चेहरा हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
पुरोहित हे मुंबई भाजपच्या वर्तुळातील एक महत्त्वाचे नाव होते. त्यांनी मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून सलग पाच वेळेस विधानसभा लढवून आपले वर्चस्व सिद्ध केले होते. त्यांनी १९९०, १९९५, १९९९ आणि २००४ अशा सलग निवडणुकांमध्ये विजय मिळवला होता. त्यांनी पक्षाच्या बांधणीत सक्रिय भूमिका बजावली. त्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये कामगार व संसदीय कार्यमंत्री यांसारखे महत्त्वाचे मंत्रिपदही सांभाळले.
नुकत्याच झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 221 मधून राज पुरोहित यांचा मुलगा आकाश पुरोहित विजयी झाला होता.
त्यांच्या निधनाने एक अनुभवी, अभ्यासू आणि जनतेशी नाळ जोडलेला नेता काळाच्या पडद्याआड गेला असून, महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक जीवनात ही मोठी हानी मानली जात आहे. राज के. पुरोहित यांचे पार्थिव रविवार, १८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११:०० ते दुपारी १:०० या दरम्यान राजहंस बिल्डिंग, जी रोड, मरीन ड्राइव्ह, मुंबई येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




